शेणोली, ता. कराड (प्रतिनिधी):
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी दि. १५ जून २०२६ रोजी शेणोली गावात नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली तसेच संजीवनी विद्यामंदिर शेणोली येथे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
सकाळपासूनच गावामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागताची लगबग सुरू होती. शेणोली गावातील बाजार चौक येथे विशेषरित्या ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. नारळाच्या झावळ्या, रंगीबेरंगी फुगे आणि आकर्षक सजावटीने ट्रॅक्टर सुशोभित करण्यात आला होता. या सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थी तसेच संजीवनी विद्यामंदिरमधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसविण्यात आले.
यानंतर गावातील बाजारपेठेतून विद्यार्थ्यांची भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझीम व वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक उत्साहात पुढे सरकत होती. “आमचं गाव, आमची शाळा… आमची शाळा, आमचा अभिमान!” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणदणून गेला. मिरवणुकीत तिन्ही शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गावातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ही स्वागत फेरी ग्रामपंचायत शेणोली येथे पोहोचली. यावेळी कराड पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी शैलेश पाटील, सरपंच प्रशासक सौ. रेश्मा सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी जयश्री नलवडे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
त्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी शैलेश पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शाळेची पाहणी केली. शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच शाळेसमोरील विविध अडचणी, गरजा आणि उपलब्ध सुविधांबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा करून आवश्यक बाबींची माहिती घेतली.
ही स्वागत मिरवणूक यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड, सतीश कणसे, युवराज कणसे, संतोष साळुंखे, संदीप गिरी, वैभव माळी, संदीप गुणवंत, शांताराम कणसे, विश्वजीत कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थ, पालक व शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या स्वागताची ही भव्य मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलेचे मुख्याध्यापक नरेंद्र सावंत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलीच्या मुख्याध्यापिका विजया गोतपागर तसेच संजीवनी विद्यामंदिर शेणोलीच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे अशा अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने स्वागत करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आकर्षण निर्माण झाले असून संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गावातील शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा, पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

