मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे 9920806563
मुंबई, दि. ३० जून २०२६ : अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक महामोर्चा अभूतपूर्व प्रतिसादात आणि उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकरी अनुयायी, विविध अनुसूचित जातींचे समाजबांधव, महिला-पुरुष कार्यकर्ते, सामाजिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या विराट जनसमुदायाने आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात ठाम भूमिका मांडत सामाजिक ऐक्य आणि संविधाननिष्ठ संघर्षाची प्रभावी साक्ष दिली.

महामोर्चात आद. डॉ. भीमराव य. आंबेडकर, आद. सरसेनानी आनंदराज आंबेडकर, आमदार राजकुमार बडोले, बबनराव घोलप, ॲड. डॉ. सुरेश माने, बाबुराव माने, संजय खामकर, आमदार ज्योती गायकवाड, आमदार सिद्धार्थ खरात, जयदेव गायकवाड, आमदार संजय मेश्राम तसेच भिक्खू संघाचे प्रतिनिधी आणि विविध सामाजिक, राजकीय व आंबेडकरी चळवळीतील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी एकजुटीची गरज अधोरेखित करत उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.

मुसळधार पाऊस सुरू असतानाही लाखो मोर्चेकऱ्यांचा उत्साह, शिस्त आणि निर्धार किंचितही कमी झाला नाही. पावसाची पर्वा न करता सहभागी झालेल्या जनसमुदायाने हा संघर्ष केवळ एका मागणीसाठी नसून संविधान, सामाजिक न्याय आणि समान हक्कांच्या रक्षणासाठी असल्याचा ठाम संदेश दिला.

या महामोर्चामध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)च्या महाराष्ट्रातील ६२ पुरुष जिल्हा शाखा, ५० महिला जिल्हा शाखा, मुंबईतील ६ झोन शाखा, ६ महिला झोन शाखा तसेच त्यांच्या अंतर्गत कार्यरत १०८ शाखांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यासोबतच समता सैनिक दलाचे अधिकारी, सैनिक आणि महिला सैनिक यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने महामोर्चाची जबाबदारी सांभाळत संघटनात्मक ताकदीचे प्रभावी दर्शन घडविले.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी मुसळधार पावसात कोणतीही पर्वा न करता रेनकोट बाजूला ठेवून संपूर्ण महामोर्च्याचे प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांच्या समर्पित नेतृत्वामुळे भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलातील कार्यकर्ते व सैनिकांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला.

महामोर्चा यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व सामाजिक, राजकीय व आंबेडकरी संघटना, विविध अनुसूचित जातींचे समाजबांधव, महिला-पुरुष कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच शिस्तबद्ध सहभाग नोंदविणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) आणि समता सैनिक दलाच्या वतीने मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
महामोर्चा समन्वयक :ॲड. डॉ. एस. के. भंडारे
(ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख)बी. एच. गायकवाड
(राष्ट्रीय सचिव, केंद्रीय पर्यटन विभाग प्रमुख)ॲड. डॉ. एस. एस. वानखडे
(राष्ट्रीय सचिव, केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख)यू. जी. बोराडे
(महाराष्ट्र राज्य अध्यक्ष)विलास वानखडे
(मुंबई प्रदेश अध्यक्ष)डी. एम. आचार्य
(समता सैनिक दल हेड क्वार्टर सचिव)स्वातीताई शिंदे
(महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष)चंदाताई कासले
(मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष व समता सैनिक दल लेफ्टनंट जनरल, महिला डिव्हिजन प्रमुख)प्रदीप कांबळे
(समता सैनिक दल लेफ्टनंट जनरल व मुंबई प्रदेश उपाध्यक्ष)दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) / समता सैनिक दल

मुंबई ब्युरो चीफ प्रकाश लांडगे 9920806563

