लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश चंद्र कलासागर (आयपीएस) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न; सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसह नागरी सुविधांचे प्रश्न मांडले!डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे सुरक्षा व्यवस्था, तातडीची वैद्यकीय मदत आणि वाहतूक नियोजनाची ठोस कार्ययोजना राबविण्याची मागणी!
मूकनायक मुंबई ब्युरो चीफ प्रकाश लांडगे
मुंबई, दि. १९ नोव्हेंबर २०२६ मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकलमधील किरकोळ वादातून धारदार शस्त्रांनी होणारे जीवघेणे हल्ले, रेल्वे स्थानकांवरील पादचारी पुलांच्या दुरुस्तीमुळे प्रवाशांना सहन करावा लागणारा त्रास, बेशुद्ध अथवा गंभीर आजारी प्रवाशांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि रेल्वे स्थानकांबाहेर शेअरिंग टॅक्सीचालकांकडून केली जाणारी कथित मनमानी भाडेवसुली अशा विविध गंभीर प्रश्नांवर आज लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री. एम. राकेश चंद्र कलासागर (आयपीएस) यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच पश्चिम रेल्वेच्या पोलीस उपायुक्त श्रीमती सुनीता व्ही. साळुंखे ठाकरे (आयपीएस) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सदस्य संजय रमेश भालेराव यांनी रेल्वे प्रवाशांच्या जीविताचे संरक्षण, सुरक्षित प्रवास आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.किरकोळ वादातून चाकूहल्ले; लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न!मुंबई लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरून, गाडीत चढताना किंवा उतरताना तसेच अन्य किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादांचे रूपांतर हिंसक घटनांमध्ये होत असल्याबद्दल संजय भालेराव यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
२३ जून २०२६ रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा, तसेच १५ नोव्हेंबर २०२६ रोजी अंधेरी स्थानकाजवळ लोकलमध्ये झालेल्या वादातून फेकण्यात आलेला चाकू दुसऱ्या प्रवाशाच्या छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाल्याच्या घटनेचा त्यांनी बैठकीत उल्लेख केला.अशा घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी लोहमार्ग पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त गस्त वाढवावी. गर्दीच्या वेळेत विशेष सुरक्षा पथके तैनात करावीत, धारदार शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि स्थानकांवरील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी करावी, अशी मागणी त्यांनी केली.महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.बेशुद्ध किंवा गंभीर आजारी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी!रेल्वे प्रवासादरम्यान एखादा प्रवासी बेशुद्ध अथवा गंभीर आजारी अवस्थेत आढळल्यास त्याला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करावी, अशी मागणी संजय भालेराव यांनी केली.
संजय नानाभाऊ शिंदे नामक प्रवाशासंदर्भातील तक्रारीचा दाखला देत त्यांनी सांगितले की, एखादा प्रवासी बराच वेळ बेशुद्ध किंवा असहाय्य अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्यास रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेणे आवश्यक आहे.बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रवाशाला केवळ मद्यधुंद किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचा अंदाज बांधून दुर्लक्षित करू नये. त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करावी, प्राथमिक उपचार द्यावेत, आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून जवळच्या रुग्णालयात दाखल करावे आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना त्वरित माहिती द्यावी.याशिवाय प्रत्येक लोकल ट्रेनची शेवटची फेरी पूर्ण झाल्यानंतर सर्व डब्यांची तपासणी करावी. आपत्कालीन घटनांची अधिकृत नोंद ठेवावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली.रेल्वे पुलांच्या दुरुस्तीमुळे प्रवाशांची गैरसोय; पर्यायी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करा!मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांवर पादचारी पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणी तसेच काही पूल बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा संजय भालेराव यांनी बैठकीत मांडला.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी आणि कामगार वर्गाला स्थानकांवरील प्रचंड गर्दीमुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.कोणताही पादचारी पूल बंद करण्यापूर्वी प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. योग्य दिशादर्शक फलक लावावेत, पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी, गर्दीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक कर्मचारी तैनात करावेत आणि गरजेनुसार अतिरिक्त प्रवेश व निर्गमन मार्गांची व्यवस्था करावी.तसेच पुलांच्या दुरुस्तीची नियोजित वेळापत्रके काम सुरू होण्यापूर्वीच सार्वजनिक करावीत. दुरुस्तीची कामे करताना प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल, अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.दादर मध्य, दादर पश्चिम आणि माटुंगा स्थानकांबाहेरील शेअरिंग टॅक्सींच्या मनमानी भाडेवसुलीवर कारवाई करा!दादर मध्य रेल्वे, दादर पश्चिम रेल्वे आणि माटुंगा रेल्वे स्थानकांच्या बाहेर काही शेअरिंग टॅक्सीचालकांकडून प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींचा मुद्दा संजय भालेराव यांनी विशेषत्वाने उपस्थित केला.
प्रवाशांची गर्दी, पर्यायी वाहतुकीच्या साधनांची कमतरता आणि वाहतुकीच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन काही चालकांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्यास त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.यासाठी वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबवावी. अधिकृत शेअरिंग टॅक्सी थांबे निश्चित करावेत, शासनमान्य भाडेदर सार्वजनिक ठिकाणी ठळकपणे लावावेत आणि प्रवाशांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी हेल्पलाइन उपलब्ध करून द्यावी.सर्वसामान्य प्रवासी, कामगार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांची कोणत्याही परिस्थितीत आर्थिक लूट होऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्थानकांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करा!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत.या पार्श्वभूमीवर ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, परळ, प्रभादेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांसह मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.याशिवाय गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष पथके तैनात करावीत. वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आपत्कालीन मदत कक्ष आणि प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत.रेल्वे प्रशासन, जीआरपी, आरपीएफ, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभाग यांनी परस्पर समन्वय साधून नियोजन करावे.
६ डिसेंबरपूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा व सुविधा व्यवस्था पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी संजय भालेराव यांनी केली.प्रवाशांच्या जीविताशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही! – संजय रमेश भालेरावयावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव म्हणाले,”मुंबईची लोकल ही लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असून मुंबईची जीवनवाहिनी आहे. किरकोळ वादातून प्रवाशांवर चाकूहल्ले होत असतील, बेशुद्ध अवस्थेत आढळणाऱ्या प्रवाशांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसेल, रेल्वे पुलांच्या दुरुस्तीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असेल आणि रेल्वे स्थानकांबाहेर शेअरिंग टॅक्सीच्या नावाखाली मनमानी भाडेवसुली होत असेल, तर या सर्व बाबींची प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.प्रवाशांचे प्राण वाचवणे, त्यांना सुरक्षित प्रवासाची हमी देणे आणि त्यांचे आर्थिक शोषण रोखणे ही संबंधित प्रशासनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.
विशेषतः ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस आणि प्रभावी कार्ययोजना राबविण्यात यावी.”लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश चंद्र कलासागर (आयपीएस) आणि पश्चिम रेल्वेच्या पोलीस उपायुक्त श्रीमती सुनीता व्ही. साळुंखे ठाकरे (आयपीएस) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व गंभीर प्रश्नांवर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी आग्रही मागणी संजय भालेराव यांनी केली.या उच्चस्तरीय बैठकीला नागसेन कांबळे (महासचिव), प्रदीप कांबळे (भारतीय बौद्ध महासभा), संजय रमेश भालेराव (सामाजिक कार्यकर्ते), किरण अशोक निकम (प्रभाग क्रमांक १८९ चे प्रभाग अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गट), रियाज, देवमणी तिवारी, जगन्नाथ जव्हार, प्रशांत दिनकर (रिपब्लिकन सेना), राहुल जाधव, राजेंद्र बी. वेते, नागेश कांबळे, रमेश मा. जाधव, सागर मा. संसारे, रवि गायकवाड, मनोज गायकवाड (पँथर संघटना) आणि सुशांत ज. उके आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.


