मुंबई प्रतिनिधी : ॲड. राजगुरु बाळकृष्ण कदम
वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का; मुंबईतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश
मुंबई : आंबेडकरी राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईतील अनेक प्रमुख पदाधिकारी, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला आहे. बुधवार दिनांक १० जून २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

या पक्षप्रवेशामध्ये माजी मुंबई महासचिव आनंद भीमराव जाधव, मुंबई उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे, माजी मुंबई उपाध्यक्ष रामेश्वर दवंडे, माजी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सचिव सरवर खान, सायन कोळीवाडा समन्वयक अशोक शेळके, माजी तालुका अध्यक्ष गणेश गांगुर्डे, राजू घेगडमल, राहुल जाधव, दत्ता निकम, चंदन निकाळजे, रोहन पवार तसेच सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे माजी उमेदवार आणि माजी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ॲड. राजगुरु बाळकृष्ण कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.

याशिवाय सामाजिक कार्यकर्ते संजय घेगडमल, शशी शिंदे, चंद्रकांत खरात तसेच सायन तालुक्यातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेचा झेंडा हाती घेतला. महिला आघाडीतील माजी मुंबई महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, माजी महिला महासचिव संजना लोखंडे, माजी महिला उपाध्यक्ष साक्षीताई धोत्रे, माजी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष राखीताई बोर्डे, शीतल कांबळे आणि अवतिका गायकवाड यांनीही पक्षप्रवेश करून रिपब्लिकन सेनेला आपला पाठिंबा जाहीर केला.

या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील रिपब्लिकन सेनेची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे. सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय, समता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार नव्याने प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या आंबेडकरी राजकारणात हा पक्षप्रवेश एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून आगामी काळात रिपब्लिकन सेनेची ताकद अधिक प्रभावीपणे वाढताना दिसेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुंबई प्रतिनिधी : ॲड. राजगुरु बाळकृष्ण कदम


