सुमननगर येथे दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार; विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचे उद्घाटन
मूकनायक मुंबई ब्युरो चीफ प्रकाश लांडगे 9920806563
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनवत निरंतर ज्ञानसाधना केली आणि त्यातून देशात वैचारिक व सामाजिक क्रांती घडवून आणली. बाबासाहेबांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती साधण्याबरोबरच समाज आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे. देशातील विद्यार्थी संघटित झाले तर ते आपल्या प्रश्नांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेऊ शकतात, हे जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे हित आणि त्यांचे मत विचारात घेतल्याशिवाय देश चालवता येणार नाही, असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा)चे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी केले.

भारतीय बौद्ध महासभा, शाखा सुमननगर आणि डॉ. आंबेडकर सेवा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट २०२६ रोजी सुमननगर येथील अंगुलीमाल बुद्ध विहारात दहावी, बारावी, डिप्लोमा व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ॲड. डॉ. भंडारे बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना डॉ. भंडारे यांनी सांगितले की, शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीचे माध्यम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास सोडली नाही. त्यांनी ज्ञानाच्या बळावर सामाजिक विषमतेला आव्हान दिले आणि वंचित समाजाला आत्मसन्मानाचा मार्ग दाखविला. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनीही शिक्षणाबरोबरच संविधान, सामाजिक समता, लोकशाही आणि आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे.

अभ्यासिका ही विद्यार्थ्यांच्या भवितव्यातील गुंतवणूक आहे, असे सांगत त्यांनी सुमननगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी समाजातील संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, चेंबूरच्या प्राचार्या डॉ. अर्चना हंडोरे, चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रशांत तायडे, स्थानिक नगरसेविका स्नेहल विष्णू शिवकर तसेच समाजसेवक व युवा कार्यकर्ते स्वप्निल वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन झोन क्रमांक पाचचे अध्यक्ष अनंत जाधव यांनी केले. यावेळी झोन कोषाध्यक्ष नारायण निकाळजे, केंद्रीय शिक्षक विजय जाधव यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे विविध पदाधिकारी, सभासद, स्थानिक कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा शाखा सुमननगरचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस विशाल कदम, कोषाध्यक्ष राजू कांबळे आणि डॉ. आंबेडकर सेवा कमिटीचे अध्यक्ष रामदास मोरे, खजिनदार शंकर तांडेल तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.

दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, विभागातील विविध समाजघटकांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यामुळे हा सत्कार समारंभ केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणारा कार्यक्रम न राहता शिक्षण, सामाजिक समता आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचा संदेश देणारा उपक्रम ठरला.
विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची ताकद आणि विचारांची दिशा दिली, तर हीच पिढी समाजाच्या परिवर्तनाचे नेतृत्व करू शकते, असा विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक आणि वैचारिक वारशाचा आदर्श घेऊन उच्च शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

