Tuesday, September 29, 2026
HomeUncategorizedभीम संकल्प दिनानिमित्त वडोदऱ्यात भव्य महारॅलीडॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो...

भीम संकल्प दिनानिमित्त वडोदऱ्यात भव्य महारॅलीडॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो सैनिक व कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक सहभाग

मुंबई प्रतिनिधी.. प्रकाश लांडगे…9920806563

बडोदा, दि. 23 सप्टेंबर 2026 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेच्या अमानवी व्यवस्थेविरुद्ध सामाजिक मुक्तीचा संकल्प केलेल्या ऐतिहासिक 23 सप्टेंबर या दिवसाचे स्मरण करत गुजरातमधील वडोदरा येथे भीम संकल्प दिनानिमित्त भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही महारॅली उत्साहात संपन्न झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानात नोकरी केली होती. त्याच ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत स्मृती भवन (कोठी) येथून चार रस्ता, सयाजी बाग मार्गे संकल्प भूमीपर्यंत ही महारॅली काढण्यात आली.

महारॅलीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मानवंदना देण्यात आली.या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड. डॉ. एस. के. भंडारे आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सचिव व गुजरात प्रभारी बी. एच. गायकवाड गुरुजी यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेल्या आर्थिक मदतीची परतफेड करण्याच्या भावनेतून बडोदा संस्थानात मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नोकरी स्वीकारली. मात्र, जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेच्या अमानवी मानसिकतेमुळे त्यांना बडोद्यात अत्यंत अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले. राहण्यासाठी जागा न मिळणे, भोजन नाकारले जाणे आणि भाड्याच्या निवासस्थानातून बाहेर काढले जाणे, या कटू अनुभवांनंतर 23 सप्टेंबर 1917 रोजी बाबासाहेबांनी सामाजिक गुलामगिरीविरुद्ध संघर्ष करण्याचा ऐतिहासिक संकल्प केला.याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 सप्टेंबर हा भीम संकल्प दिन म्हणून साजरा केला जातो.

महारॅली संकल्प भूमीवर पोहोचल्यानंतर डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर, ॲड. डॉ. एस. के. भंडारे, बी. एच. गायकवाड, प्रकाश सोमकुवर, विशाल कांबळे तसेच समता सैनिक दलाचे अधिकारी रमेश वाघमारे, ॲड. वंदना सावंत, बाळासाहेब आठवले, मधुकर हिवराळे, हिरामण पगारे, रागिणीताई पवार, स्वातीताई शिंदे, शोभाताई कांबळे, छगन सुरवाडे, विजय झनके यांच्यासह शेकडो सैनिक व कार्यकर्त्यांनी संकल्प भूमीला मानवंदना अर्पण केली.त्यानंतर संकल्प भूमी समितीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाबासाहेबांनी ज्या सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्षाचा संकल्प केला, तो संकल्प पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या ऐतिहासिक महारॅलीमध्ये भिक्खू संघ, समता सैनिक दलाच्या ठाणे, नवी मुंबई, मुंबई प्रदेश, पुणे आणि जळगाव बटालियनचे सैनिक व अधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी पुन्हा दृढ करण्यात आला.या महारॅलीचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, बडोदा जिल्हा व गुजरात दक्षिण राज्य शाखेचे अध्यक्ष प्रकाश सोमकुवर आणि सरचिटणीस विशाल कांबळे यांनी केले होते.भीम संकल्प दिनाच्या निमित्ताने वडोदऱ्याच्या ऐतिहासिक भूमीतून सामाजिक समता, स्वाभिमान आणि मानवमुक्तीच्या संघर्षाचा संकल्प पुन्हा एकदा बुलंद करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments