मूकनायक मुंबई ब्युरो चीफ
प्रकाश लांडगे. ९९२०८०६५६३
दि. २१ जुलै २०२६ : सेवानिवृत्त शिक्षिका दिवंगत सुधा कल्लाप्पा भंडारे यांच्या ११व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृती जपण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सुधा फाउंडेशन, मुंबई’च्या वतीने शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेला समर्पित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांचे नेतृत्व फाउंडेशनचे संस्थापक ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी केले.

यावेळी आष्टा (ता. वाळवा) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १४ मधील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देतानाच शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था (वॉटर सप्लाय सिस्टीम) फाउंडेशनच्या वतीने भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.त्यानंतर एकात्मिक बाल विकास नागरी प्रकल्पांतर्गत गौतम हौसिंग सोसायटी येथील अंगणवाडी क्रमांक ७३ मधील बालकांना पाटी, पेन्सिल, रंगीत पुस्तके तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

हा उपक्रम ॲड. डॉ. एस. के. भंडारे, सौ. सुमेधा भंडारे, सौ. सुचेता भंडारे, रवींद्र भंडारे आणि अमोल शिंदे यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मिन मुजावर, केंद्रप्रमुख झाकीर मुजावर, सोनाली राजेंद्र विरभक्त, अंगणवाडी सेविका वैशाली संजय जाधव, मदतनीस अनुराधा पुनाप्पा विरभक्त, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.संध्याकाळी ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी आपल्या कुटुंबीयांसह सांगली जिल्ह्यातील वारणावली येथील आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्रास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील ज्येष्ठ नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या आरोग्याची, दैनंदिन जीवनाची आणि सुविधांची विचारपूस केली. केंद्राचे व्यवस्थापक मंजुनाथ उपाध्ये यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

केंद्राच्या प्रमुख डॉ. शीतल बजरंग बने यांची भेट घेऊन ॲड. डॉ. भंडारे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सुरू असलेल्या त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.यावेळी बोलताना ॲड. डॉ. भंडारे म्हणाले की, अनेक ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक आधार उपलब्ध नसल्याने अशा सेवाकेंद्रांची गरज अधिक महत्त्वाची ठरते. आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्राने वृद्धांना सन्मान, सुरक्षितता आणि आपुलकीचे वातावरण उपलब्ध करून दिले असून, समाजासाठी हे कार्य प्रेरणादायी आहे.‘सुधा फाउंडेशन, मुंबई’ च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

दिवंगत सुधा भंडारे यांच्या स्मृती जपतानाच समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा फाउंडेशनचा हा प्रयत्न सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्य भविष्यातही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


