वरिष्ठ प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक पूणे दि. १६ एप्रिल २०२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पांतर्गत तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण पुणे यांच्या मार्फत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
या सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकार परिषद्वारे करण्यात आले.
सप्ताहभर पथनाट्याच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती, संत गाडगेबाबा महाराज व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, विविध स्पर्धा तसेच प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर उपक्रम समाजकल्याण आयुक्त तथा महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ, निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आल्याची माहिती बार्टीचे प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांनी दिली.
याच अनुषंगाने अप्पर इंदिरानगर व महाराजस्व अभियान बिबवेवाडी येथे पथनाट्याद्वारे विविध शासकीय योजनांची प्रभावी जनजागृती करण्यात आली.
दरम्यान, सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महाविद्यालय, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह इ. ठिकाणी निबंध- वक्तृत्व स्पर्धा, तसेच महिला मेळावा, स्वच्छता अभियान व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन समतादूत यांचेमार्फत जिल्ह्यात करण्यात आले.
सदर समता सप्ताहाची सांगता डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती १४ एप्रिल २०२६ रोजी बार्टी मुख्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यापर्यंत समता रॅली व अभिवादनाने करण्यात आली.
सदर सामाजिक समता सप्ताह पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी शितल बंडगर यांचे नियोजनाखाली समतादूत किर्ती आखाडे, उषा कांबळे, तेजस्विनी कांबळे, प्रशांत कुलकर्णी, संगीता शहाडे, अनिता दहीकांबळे, शशिकांत जाधव, सचिन कांबळे, भारती अवघडे यांनी नियोजित कार्यक्रम घेऊन यशस्वीपणे पार पाडला.



