बुद्ध धम्म संस्कृतिक मंचाच्या वतीने तीन महिन्यांच्या वर्षावास प्रवचन मालिकेला सुरुवात
मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे….9920806563
शेलू, ९ ऑगस्ट २०२६ : बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासोबतच समता, न्याय आणि बंधुतेची मूल्ये समाजामध्ये रुजविण्याच्या उद्देशाने बुद्ध धम्म संस्कृतिक मंच, आरवली संकुल, शेलू यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या वर्षावास प्रवचन मालिकेचे पहिले पुष्प रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
बौद्ध परंपरेनुसार आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंतच्या सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीला वर्षावास म्हटले जाते. या काळात धम्माचे अध्ययन, चिंतन, मनन, साधना तसेच धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याला विशेष महत्त्व आहे. भगवान बुद्धांच्या काळापासून चालत आलेल्या या परंपरेचा उद्देश केवळ धार्मिक आचरणापुरता मर्यादित नसून, व्यक्ती आणि समाजाच्या नैतिक व वैचारिक विकासालाही त्यातून चालना मिळते.

या वर्षावासाच्या पहिल्या प्रवचनाचे पुष्प आयुष्यमान धम्मप्रचारक आनंद साळवी सर यांनी गुंफले. ‘वर्षावासाचे महत्त्व तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय आणि बंधुतेच्या विचारधारा’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. बुद्ध धम्मातील समतेची शिकवण आणि महापुरुषांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा परस्पर संबंध त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

या कार्यक्रमाला आरवली संकुलातील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प, घाटकोपर, कुर्ला तसेच इतर विविध भागांतून आरवली संकुल, शेलू येथे वास्तव्यास आलेल्या बौद्ध बांधवांनी स्थलांतरानंतरही आपल्या धम्माशी, संस्कृतीशी आणि सामाजिक विचारांशी असलेले नाते कायम ठेवले आहे. आपल्या धम्माचे सण, परंपरा आणि वैचारिक उपक्रम सातत्याने साजरे करून त्यांचा प्रभावी प्रचार-प्रसार करण्याचे कार्य येथील बौद्ध बांधव करत आहेत.
विशेष म्हणजे, या धम्मकार्याला आरवली संकुलातील सर्व रहिवाशांचे भरभरून सहकार्य मिळत असून, वर्षावासाच्या निमित्ताने संपूर्ण तीन महिन्यांच्या कालावधीत विविध विषयांवर प्रवचनांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. या माध्यमातून बुद्ध धम्माची वैज्ञानिक, मानवतावादी आणि समतावादी विचारधारा समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

बुद्ध धम्म संस्कृतिक मंचाच्या वतीने दरवर्षी वर्षावासाचे आयोजन केले जाते. या वर्षीची प्रवचनमाला यशस्वी करण्यासाठी मंचाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजन, प्रचार-प्रसार आणि आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. धम्मकार्याची ही चळवळ शेलू परिसरात अधिक व्यापक व्हावी आणि आगामी काळातही अशाच प्रकारे धम्म, संस्कृती व सामाजिक प्रबोधनाचे कार्य अखंड सुरू राहावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या धम्मकार्याबद्दल ‘मूकनायक’ साप्ताहिक आणि ‘मूकनायक’ यूट्यूब चॅनेलच्या वतीने बुद्ध धम्म संस्कृतिक मंचाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आरवली संकुलातील सर्व बौद्ध बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. समता, न्याय, बंधुता आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करणारे हे कार्य अधिक जोमाने पुढे जावो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
बुद्ध धम्म संस्कृतिक मंच, आरवली संकुल, शेलू – पदाधिकारी
अध्यक्ष : आयुष्यमान अतुल बनसोडे
सचिव : आयुष्यमान सिद्धांत जाधव
खजिनदार : आयुष्यमान सुरज बारसिंग
सल्लागार : आयुष्यमान सुनील किर्ते
बुद्ध धम्म संस्कृतिक मंच
आरवली संकुल, शेलू – ४१०१०१

