Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रवसमत येथे महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी

वसमत येथे महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी

संविधानाच्या उद्देशिकांचे वाटप

​वसमत (जि. हिंगोली):येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि योग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्यासमोर महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.​

कार्यक्रमाची सुरुवात स्मारक समितीचे यशवंतराव उबारे यांच्या हस्ते वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी नगरसेवक राजकुमार एंगडे यांच्या वतीने उपस्थितांना १०० भारतीय संविधानाच्या उद्देशिकांचे वाटप करण्यात आले. योग शिक्षक डॉ. एन. एन. कुंटे यांनी प्रास्ताविक सादर करत उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेची सामूहिक शपथ दिली. डॉ. रवींद्र तेलगोटे यांनी स्वातंत्र्यदिन आणि वामनदादा कर्डक जयंतीचे औचित्य साधून उपस्थितांना चॉकलेट वाटून शुभेच्छा दिल्या, तर नामदेव इंगोले यांनी वामनदादांच्या गीतांमधून प्रबोधन केले.​

या कार्यक्रमाला यशवंतराव उबारे, देशमुख सर, गौतम पारखे, वसंत खिल्लारे, अनिल ताकतोडे, अनिल पंडित, सोनवणे, थोरात, नारायण एंगडे, सिद्धार्थ कांबळे, रत्नमाला एंगडे यांच्यासह अनेक उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.​तसेच, हर्षनगर येथील संबोधी बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनेही वामनदादा कर्डक यांची जयंती साजरी करण्यात आली. येथे सामूहिक त्रिशरण-पंचशील, बुद्ध वंदना व गाथा घेऊन अभिवादन करण्यात आले. भगवान सूर्यतल, नामदेव इंगोले व भगवान सोनकांबळे यांनी वामनदादांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. नंद यांनी केले, तर साहेबराव सरोदे यांनी आभार मानले. या प्रसंगी भीमराव शेळके, डॉ. नामदेव मुळे, मिलिंद आळणे, संभाजी कस्बे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments