मूकनायक विशेष | मुंबई प्रतिनिधी : प्रकाश लांडगे
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीला पूर आला असून रहाटणी प्रभागातील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. रहाटणी गावठाण, पवनानगर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर तसेच गंगानगर परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशामक दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासनाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांची तात्पुरती निवास व्यवस्था रहाटणी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५५ मध्ये करण्यात आली आहे.
या संपूर्ण बचाव आणि मदतकार्यादरम्यान नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य श्री. बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करत असल्याचे दिसून आले. पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनासोबत मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
यावेळी श्री. बाबासाहेब त्रिभुवन यांनी, “प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत समन्वय ठेवून नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू,” असे सांगितले.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे, आवश्यक असल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे तसेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

