मूकनायक विशेष | अभिजित लांडगे | जत तालुका प्रतिनिधी
येळवी (ता. जत, जि. सांगली), दि. ३० मे २०२६ : महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा ग्रामीण महाराष्ट्रात घडताना दिसत आहे. गावागावांत आणि खेड्यापाड्यांत आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नव्या जोमाने संघटित होत असून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील येळवी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री, समाजरत्न मा. रामदासजी आठवले साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. राजाभाऊ सरवदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. संजय कांबळे, प्रदेश सचिव मा. जगन्नाथ ठोकले, जिल्हाध्यक्ष मा. राजेश खरात, तालुकाध्यक्ष मा. संजय कांबळे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. रामदासजी आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत संघटनात्मक बळ वाढविण्याचे आवाहन केले. सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि राजकीय सक्षमीकरणासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच सौ. आरतीताई अंकलगी, उपअभियंता मा. अनिल अंकलगी, पोलीस पाटील सौ. वंदना पाटील, पंचायत समिती सदस्य तथा पुढारी तालुका प्रतिनिधी श्री. विजय रुपनूर, पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी मा. मारुती मदने, केसरी तालुका प्रतिनिधी संतोषकुमार पोरे, कृषी अधिकारी मा. रविकिरण पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी येळवी शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी रुपेश भोसले, उपाध्यक्ष अनिल गंगणे, कार्याध्यक्ष अभिजित लांडगे, सचिव शेखर सुर्वे, खजिनदार अंकुश कांबळे, सहसचिव प्रवीण लांडगे, सरचिटणीस गोरख सुर्वे, संघटक संभाजी सुर्वे, संपर्क प्रमुख महेश गंगणे, सल्लागार संतोष आटवले आणि सुनील शिंदे, मार्गदर्शक शिंदेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच नंदकुमार लांडगे, वैभव सुर्वे, धनराज भोसले यांच्यासह सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.येळवी येथे स्थापन झालेली ही शाखा केवळ संघटनात्मक विस्तार नसून सामाजिक परिवर्तनाच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ही शाखा प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने येळवीसह संपूर्ण परिसरात आंबेडकरी चळवळीच्या नव्या उमेदीचा संदेश दिला आहे.


