मुंबई प्रतिनिधी… प्रकाश लांडगे
देशात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत व्यक्त केलेल्या संभाव्य जागतिक परिस्थितीबाबतच्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः इराण-इजरायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. या भीतीचा परिणाम म्हणून काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची गंभीर तक्रार समोर आली. स्थानिक रहिवाशांनी याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सरचिटणीस अनिष खंडागळे यांच्याकडे धाव घेतली. नागरिकांच्या अडचणीची तात्काळ दखल घेत खंडागळे यांनी संबंधित गॅस एजन्सीला जाब विचारला असता धक्कादायक माहिती समोर आली की, या संपूर्ण परिसरासाठी दररोज केवळ दहा गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जात होता.
ही परिस्थिती अत्यंत अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत अनिष खंडागळे यांनी ठाम भूमिका घेतली आणि तातडीने पुरवठा वाढवण्याची मागणी केली. त्यांच्या ठोस आणि धडाकेबाज पाठपुराव्यामुळे गॅस एजन्सीला आपली भूमिका बदलावी लागली. सुरुवातीला 60 सिलेंडरची मागणी करण्यात आली असली तरी तातडीच्या उपाययोजनेतून दररोज किमान 40 गॅस सिलेंडर पुरवठा करण्याचे आश्वासन एजन्सीकडून देण्यात आले आहे.
या घटनेमुळे एकीकडे संकटकाळात काही घटकांकडून परिस्थितीचा गैरफायदा घेतला जात असल्याचे स्पष्ट होत असताना, दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांसाठी तत्परतेने उभे राहणाऱ्या नेतृत्वाची गरज अधोरेखित झाली आहे. माटुंगा लेबर कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देणारा हा निर्णय असला तरी भविष्यात अशा प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनानेही अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

