राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश भाऊ पारधी यांची प्रमुख उपस्थिती
पहेला (भंडारा) : “सन्मान द्या व सन्मान घ्या” या सामाजिक उपक्रमांतर्गत पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त 9 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता सम्यक बुद्ध विहार, पहेला येथे भव्य सत्कार सोहळा, गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ तसेच सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कृषी, आरोग्य, साहित्य, कला आणि समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दैनिक माझा मराठवाडाचे मुख्य संपादक तथा ज्ञानपंख न्यूज चॅनलचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे राहणार आहेत. कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून फिल्म अभिनेते अश्विनकुमार वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, नृत्यांगना वैशाली मडावी, ब्ल्यू स्टार्म न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश सोनवणे (पुणे), ज्येष्ठ पत्रकार गोकुळसिंग राजपूत (छत्रपती संभाजीनगर), संविधान बचाव संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर, माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गोंदिया जिल्हाध्यक्ष तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश भाऊ पारधी यांची प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. युवक, ओबीसी समाज आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेले गणेश भाऊ पारधी यांनी सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रबोधन आणि युवक संघटन बळकटीसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील 76 सामाजिक कार्यकर्ते व 4 गुणवंत विद्यार्थ्यांसह एकूण 80 जणांचा शाल, मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात येणार आहे. समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिकरित्या सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजक पत्रकार संजीव भांबोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

