Sunday, July 26, 2026
Homeमुंबईसोनम वांगचुक आणि कुमार अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा; बुद्धीस्ट एज्युकेशन सोसायटीच्या...

सोनम वांगचुक आणि कुमार अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा; बुद्धीस्ट एज्युकेशन सोसायटीच्या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी प्रकाश लांडगे 9920806563

मुंबई, दि. २० जुलै २०२६ : बुद्धीस्ट एज्युकेशन सोसायटी, लुंबिनीबाग, गोवंडी यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सोनंम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच कुमार अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

या मोहिमेला परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक, महिला आणि विविध सामाजिक घटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.देशातील शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर समाजाने जागरूक राहण्याची गरज व्यक्त करत या मोहिमेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या स्वाक्षरी मोहिमेची प्रमुख मागणी म्हणजे नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही ठाम मागणी करण्यात आली.सोनंम वांगचुक यांनी देशातील शिक्षण व्यवस्था, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने उभारलेला आवाज तसेच कुमार अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला समाजातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे या स्वाक्षरी मोहिमेतून स्पष्ट झाले.

शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार असून त्यामध्ये भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि राजकीय हस्तक्षेपाला कोणतेही स्थान नसावे, अशी भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली.बुद्धीस्ट एज्युकेशन सोसायटीने या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व नागरिक, विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ बांधवांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

शिक्षणातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या जनआंदोलनात समाजाने पुढेही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments