मूकनायक प्रतिनिधी / जतिन मोरे : रायगड जिल्ह्यात बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ बौद्धाचार्य, श्रामणेर तथा रायगड जिल्ह्याचे प्रथम केंद्रीय शिक्षक कालकथित काशिनाथ रामभाऊ सोनावणे यांचे निधन दि. १५ जून २०२६ रोजी झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यानुमोदन व श्रद्धांजली सभेचे आयोजन शनिवार दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खालापूर येथील मौजे नावंढे या ठिकाणी करण्यात आले आहे. कालकथित काशिनाथ सोनावणे यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून दादर चैत्यभूमी येथे श्रामणेर तसेच केंद्रीय शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तत्कालीन भारतीय बौद्ध महासभेचे खालापूर तालुक्यातील कार्यकर्ते देवजी सोनवणे व पी. एस. कांबळे यांच्यासमवेत त्यांनी धम्म प्रचाराचे व्यापक कार्य उभारले होते. त्यांच्या कार्यामुळे अनेक ठिकाणी धम्मविचार रुजविण्यात आणि सामाजिक प्रबोधन घडविण्यात महत्त्वाचे योगदान मिळाले. काशिनाथ सोनावणे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र गोपीनाथ सोनवणे हे देखील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून सध्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हा संघटक म्हणून जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. कालकथित काशिनाथ सोनावणे यांच्या पुण्यानुमोदन व श्रद्धांजली सभेस समाजबांधव, धम्मप्रेमी, नातेवाईक व हितचिंतकांनी उपस्थित राहण्याची विनंती गोपीनाथ सोनावणे आणि परिवारातर्फे करण्यात आली आहे.


