रहाटणीतील आनंद बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी, १६ एप्रिल २०२६ – ज्यादिवशी जगभरात भारताची ओळख विश्वगुरु आणि आत्मनिर्भर म्हणून होईल त्यादिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विश्वरत्न ही उपाधी सार्थक ठरेल. त्यासाठी प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सन्मान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार, विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, अशा शब्दांत आमदार शंकर जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
रहाटणी येथील आनंद बुद्ध विहार याठिकाणी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रभाकर दाभाडे, माजी वरिष्ठ वैज्ञानिक श्री. डोके, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक सागर कोकणे, आनंद बुद्ध विहाराध्यक्ष महादेव कांबळे, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, सचिव पोपट कदम, खजिनदार शशिकांत शेलार, संघटक सखाराम कांबळे यांच्यासह आनंद मित्र मंडळाचे सर्व सदस्य व बौद्ध उपासक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या अधिकारांच्या माध्यमातून आपण आपापल्या महापुरुषांच्या आणि देवी देवतांच्या जयंत्या मोठ्या उत्साहात साजरी करू शकतो. हीच या संविधानाची खरी ताकद आहे. त्यामुळे जोपर्यंत सूर्य, चन्द्र, तारे आहेत तोपर्यंत संविधानाला कोणीही हात लावू शकणार नाही, असा विश्वास खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेला आहे.
बाबासाहेबांचे वर्चस्व जलनीतीपासून अर्थनीतीपर्यंत सर्व विषयांमध्ये होते. त्यांच्या अर्थनीतीमुळेच जगात १४व्या क्रमांकावर असणारा आपला देश आज ४थ्या क्रमांकावर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा जतन करण्यासाठी पंचतीर्थांची संकल्पना आणली. ज्यामध्ये त्यांच्या जन्मगाव महूपासून लंडनमधील त्यांचे निवासस्थानपर्यंत महत्वाच्या पाच स्थळांचा पर्यटन स्थळांचा दर्जा मोदी सरकारने दिला. आणि ही अभिमानाची बाब असल्याचे जगताप यावेळी म्हणाले.

