“माझे विचार, माझी ताकद” या मालिकेची सुरुवात करताना एक स्पष्ट भूमिका घेतली होती विचारांशी तडजोड नाही, सत्य लपवणार नाही आणि समाजाला अंधारात ठेवणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीला थेट प्रश्न विचारणार. कारण महाराष्ट्र हा गप्प बसणाऱ्यांचा नाही, तर अन्यायाला डोळ्यात डोळे घालून उत्तर देणाऱ्यांचा आहे.
हीच ती भूमी जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वाभिमान शिकवला, राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचा मार्ग दाखवला, महात्मा ज्योतिराव फुले यांनी अज्ञानाविरुद्ध लढा दिला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर्कशक्तीचा दीप प्रज्वलित केला आणि संत गाडगे महाराज यांनी अंधश्रद्धेवर झाडू फिरवला. पण आज हाच महाराष्ट्र एका कटू वास्तवाशी सामना करतो आहे जिथे विचारांचा वारसा सांगणारेच लोक अंधश्रद्धेच्या पायाशी नतमस्तक होताना दिसतात.
नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात या तथाकथित ‘बाबा’भोवती तयार झालेलं जाळं आता केवळ श्रद्धेचा विषय राहिलेला नाही. हा प्रश्न आहे सत्तेचा, प्रभावाचा आणि समाजाला चुकीच्या दिशेने नेणाऱ्या प्रवृत्तींचा. कारण जेव्हा सामान्य माणूस बाबांकडे जातो, तेव्हा ती त्याची वैयक्तिक बाब असते; पण जेव्हा राज्य चालवणारे, निर्णय घेणारे आणि समाजाला दिशा देणारे नेते अशा दरबारात हजेरी लावतात, तेव्हा तो प्रश्न सार्वजनिक होतो.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि इतर काही प्रभावशाली राजकीय चेहरे या बाबाशी जोडले गेल्याच्या चर्चा उघडपणे होत आहेत. या केवळ अफवा म्हणून झटकून टाकण्याइतक्या हलक्या नाहीत, कारण त्यातून एक धोकादायक संदेश समाजात पोहोचतो की सत्ता आणि अंधश्रद्धा यांचं नातं दिवसेंदिवस घट्ट होत आहे.
यात आणखी एक गंभीर आरोप समोर येतो मंत्री दीपक केसरकर यांनी रस्ता बांधण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी दिल्याची चर्चा. जर हे वास्तव असेल, तर हा प्रश्न केवळ श्रद्धेचा राहत नाही; हा प्रश्न आहे जनतेच्या पैशाचा, प्राधान्यक्रमांचा आणि सत्तेच्या वापराचा.
एकीकडे संविधानाची शपथ घेणारे नेते, आणि दुसरीकडे बाबांच्या पायाशी नतमस्तक होणारी त्यांची कृती हा विरोधाभास महाराष्ट्राच्या पुरोगामी ओळखीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. कारण नेतृत्व हे केवळ पद नसतं, ते एक आदर्श असतं. आणि जेव्हा आदर्शच डळमळीत होतात, तेव्हा समाज दिशाहीन होतो.
अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानातून जन्म घेत नाही, ती सत्तेच्या संरक्षणाखाली वाढते. आणि जेव्हा सत्ताधारीच तिला खतपाणी घालतात, तेव्हा ती समाजाच्या मुळावर घाव घालते. आज गरज आहे ती नावं उघड करण्याची नाही, तर जबाबदारी निश्चित करण्याची.
शेवटी प्रश्न फक्त इतकाच नाही की कोणत्या नेत्याने कोणत्या बाबाच्या पायाशी डोकं ठेवलं…
खरा प्रश्न हा आहे की, ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर हात ठेवून शपथ घेतली, तेच जर निर्णय घेण्याआधी बाबांच्या दरबारात जात असतील… तर मग हा देश संविधानाने चालतोय की अंधश्रद्धेने?
जर जनतेचा नेता बाबांच्या आशीर्वादावर चालत असेल, तर सामान्य माणसाने मग विज्ञानावर आणि शिक्षणावर विश्वास ठेवायचा तरी का?
आणि जर उद्या एखादा निर्णय हा लोकांच्या भल्यासाठी नसून “आशीर्वाद” घेऊन घेतला गेला… तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
महाराष्ट्राला विचारांचा वारसा देणारे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि संत गाडगे महाराज आज असते, तर त्यांनी या दृश्याकडे पाहून नेमकं काय म्हटलं असतं?
कदाचित तेही हाच प्रश्न विचारले असते
“हीच का ती प्रगती… जिथे सत्तेचा मार्ग विज्ञानातून नाही, तर अंधश्रद्धेच्या दरबारातून जातो?”
आणि आता हा प्रश्न फक्त नेत्यांसमोर नाही…तो प्रत्येक जागृत नागरिकासमोर उभा आहे महाराष्ट्र विचारांनी चालणार… की बाबांच्या इशाऱ्यावर?
वैचारिक अखाडा
प्रकाश लांडगे

