Saturday, March 14, 2026
Homeपुणेजागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

पुणे : बुद्धघोष बुद्धविहार, जुनी सांगवी, पुणे येथे दिनांक 8 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे आयु. स्नेहा जेकटे, आयु. श्रीकृष्ण, प्रा. अर्चना कांबळे, आयु. सुनीता मोहिते उपस्थित होते.

सुरुवातीला या मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी आयु.स्नेहा जेकटे यांनी जागतिक महिला दिनाचा इतिहास थोडक्यात सांगितला. महिलांनी जगामध्ये अनेक आंदोलने केली व त्याला यश आले. स्त्री मुक्तीसाठी अनेक महापुरुषांनी योगदान दिले त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे हे सांगितले.

संविधान जागर समितीचे समन्वयक आयु .श्रीकृष्ण यांनी यावेळी सांगितले की ,”अमेरिका, युरोप व इतर देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, महिला कामगारांना समान न्यायाने वागविले जात नव्हते. पुरुषाप्रमाणे अधिकार व संधी नव्हत्या. हे सर्व भारतातील महिलांना स्वातंत्र्यानंतर संविधानामुळे मिळाले. इतर देशातील महिलाप्रमाणे भारतातील महिलांना लढा द्यावा लागला नाही, संघर्ष करावा लागला नाही हे आपल्या संविधानाचे महत्त्व आहे. महापुरुषांचे प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले,छ. शाहू महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्याग व कष्टामुळे क्रांती झाली, सुधारणा झाल्या याची जाणीव ठेवणे ही काळाची गरज आहे .

एका बेटावर महिलांची विक्री होते, त्या गायब होतात त्याची दखल घेतली जात नाही अशा अनेक घटना जगामध्ये होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महिलांच्या स्वातंत्र्य व हक्क व अधिकारावर हल्ला होत आहे. त्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे व महिलांचे शोषण थांबविले पाहिजे.” प्रा.अर्चना कांबळे यांनी सांगितले की, “राजमाता जिजाऊने बाल शिवाजी वर संस्कार करून इतिहास घडविला. तसेचअनेक महापुरुषांचे आपल्यावर संस्कार आहेत. आजच्या काळात सध्या poxo कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे झाली पाहिजे. नाबालिंग मुलीवर शारीरिक अत्याचार होत आहेत , प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलींचे शोषण केले जाते. आरोप व गुन्ह्यामुळे तरुण मुलांचे आयुष्य बरबाद होत आहेत. सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. ती त्वरित थांबली पाहिजे. मुला- मुलींमध्ये समानता असली पाहिजे पण ती व्यावहारिक असावी. काही पुरुष धुम्रपान, नशापान करीत असतात तसे मुली व महिलांनी अनुकरण करणे अपेक्षित नाही.

काही वेळा महिलांचे शोषण महिलाच संसारात करतात. सासु -सुनेचे नाते ,नणंद- भावजयीचे नाते महत्त्वाचे आहे. पुरुषासोबत वागतांना चूक किंवा बरोबर हे दोघांनाही कळले पाहिजे. स्त्री कोणत्याही धर्मात तसेच घरात, व घराबाहेर सुरक्षित नव्हती. कमी वयात व बिन लग्नाचे बाळ काखेत घेऊन काम करणाऱ्या स्वतःचे व इतरांचे पोट भरणाऱ्या मुलींना मुख्य प्रवाहात शिक्षण देऊन आणले पाहिजे. हे सर्वच नागरिकांचे कर्तव्य आहे. संविधानाने आपल्याला हक्क व अधिकार दिले त्यामुळेच आज चांगले दिवस जगणे आपल्या हातात आहे.”

यावेळी आयु.कल्पना सरोदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “महिलांच्यावर संसाराची पूर्ण जबाबदारी असते, काही महिलांना नोकरी करावी लागते ही त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी आहे. सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक व राजकीय क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. परंतु काही ठिकाणी पुरुषांनी स्त्रीवर हक्काने पुरुषी मानसिकता लादलेली आहे. कुटुंबातील सुख, समृद्धी, शांतीसाठी पुरुषांनी महिलांना संधी, साथ व सन्मान दिला पाहिजे. तरीच चांगले वातावरणात प्रगती होईल. पुरुषांनी महिलांना शारीरिक व मानसिक त्रास नव्हे तर साथ , प्रतिष्ठा व आत्मसन्मान दिला पाहिजे.”

यानंतर तक्षशिला महिला संघाच्या अध्यक्षा आयु. सुनिता मोहिते यांनी मनोगत मांडताना सांगितले की,” स्त्री- पुरुष समानता ही घरामध्ये व घराबाहेर असली पाहिजे. त्यासाठी दोघांचेही योगदान असले पाहिजे.यानंतर आयु. स्नेहा जेकटे यांनी सर्व उपस्थितांना महिला सन्मानाची शपथ दिली. प्रा. रवींद्र इंगोले यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आयु.सुरेश शिंदे यांनी केले.

यावेळी बुद्धघोष हौसिंग सोसायटी, बुद्धघोष मित्र मंडळ, तक्षशिला महिला संघ, त्रिरत्न ग्रुप, भारतीय बौद्ध महासभा शाखा सांगवी पूर्व चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकार विजय गायकवाड, आयु. शरद जांभळीकर, आयु. सुरेश शिंदे, अशोक काळे, मारुती मोहिते, जी.आर. कांबळे ,दयानंद ढवळे, प्रिया कांबळे, अशोक गायकवाड व इतर यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments