Wednesday, November 25, 2026
Homeमंबईबाहेरगावाहून येणाऱ्या अनुयायांसाठी पर्यायी रिक्षा थांबा आणि बेस्ट बसची सुविधा द्या!संजय रमेश...

बाहेरगावाहून येणाऱ्या अनुयायांसाठी पर्यायी रिक्षा थांबा आणि बेस्ट बसची सुविधा द्या!संजय रमेश भालेराव यांची अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे मागणी; इंदू मिल आंदोलनातील आठवणींनाही उजाळा

मुकनायक मुंबई ब्युरो चीफ : प्रकाश लांडगे

मुंबई, दि. २४ नोव्हेंबर २०२६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर अनुयायांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था तसेच त्यांच्या प्रवासाच्या सुविधांचे नियोजन करण्यासाठी मुंबई पोलीस पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता चेंबूर येथील त्यांच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सदस्य संजय रमेश भालेराव यांनी बाहेरगावाहून रिक्षाने मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या वाहतुकीचा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला.

पुणे, सोलापूर तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून रिक्षाने येणाऱ्या अनुयायांना सायन परिसरातून मुंबई शहरात पुढे जाण्यास अडचणी येतात. त्यामुळे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची मोठी गैरसोय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.या पार्श्वभूमीवर चुनाभट्टी येथील सोमय्या गार्डन परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या रिक्षांसाठी पर्यायी रिक्षा थांबा किंवा वाहनतळ उपलब्ध करून द्यावा. तसेच तेथून चैत्यभूमीपर्यंत जाण्यासाठी बेस्ट बसची विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली. यासाठी बेस्ट प्रशासनाशी समन्वय साधून स्वतंत्र विनंतीपत्र देण्याची आवश्यकताही मांडण्यात आली. या मागणीची दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी यांनी संबंधित ठिकाणी रिक्षा थांब्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यंदा ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन रविवार असल्याने मुंबईत लाखो अनुयायांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन ४ ते ६ डिसेंबर या कालावधीत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी समन्वयक समितीच्या वतीने करण्यात आली. पूर्व प्रादेशिक विभागाच्या अखत्यारीतील बुद्धविहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे तसेच अनुयायांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची विनंती करण्यात आली.या विभागांतर्गत असलेल्या तीन पोलीस उपायुक्त, नऊ सहायक पोलीस आयुक्त आणि २१ पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून योग्य समन्वय साधून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

यावर धनंजय कुलकर्णी यांनी संबंधित पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पूर्वतयारीची आढावा बैठक घेऊन आवश्यक बंदोबस्त व कायदा-सुव्यवस्थेचे नियोजन करण्याचे निर्देश देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. तसेच चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यास मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्याची समितीची विनंतीही त्यांनी मान्य केली.इंदू मिल आंदोलनातील संघर्षाच्या आठवणींना उजाळाया बैठकीला केवळ महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनापुरते मर्यादित न ठेवता आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक इंदू मिल आंदोलनाच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. धनंजय कुलकर्णी यांनी यापूर्वी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त तसेच मुंबई पोलीस जी विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे चैत्यभूमी परिसरातील महापरिनिर्वाण दिनाचे नियोजन आणि आंबेडकरी अनुयायांच्या विविध प्रश्नांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे.

इंदू मिल आंदोलनाचे साक्षीदार असलेल्या कुलकर्णी यांनी यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. इंदू मिल आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पार पडलेल्या प्रक्रियेत संबंधित समितीचे सचिव म्हणून त्यांनी केलेल्या सहकार्याची उपस्थितांनी कृतज्ञतापूर्वक आठवण करून दिली. त्यांच्या पोलीस उपायुक्तपदाच्या कार्यकाळात आंबेडकरी चळवळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना मिळालेल्या सहकार्याचाही यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र सचिव गौतमभाऊ सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे, सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव, रवी गायकवाड, कामगार नेते रमेश जाधव, प्रतीक कांबळे, अलंकार जाधव, राहुल जाधव, सुशांत रुके, श्रीकांत भिसे आणि रमेश घुगसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या प्रत्येक अनुयायाला सुरक्षित प्रवास, योग्य वाहतूक सुविधा आणि शांततेत अभिवादन करण्यासाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध व्हावी, हा या बैठकीतील चर्चेचा मुख्य उद्देश होता.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments