मूकनायक विशेष
डॉ. अमोल अन्नदाते 9421516551
काल १९ वर्षांच्या एका मुलाने नव्या iPhone Pro 15 साठी छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव परिसरातील खवड्या डोंगराच्या कड्यावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचे वडील आणि तो मुलगा दोघेही त्या कड्यावरून खाली कोसळले. हे पाहून मानसिक धक्क्यातून त्यांच्या आईनेही पुढच्या काही सेकंदांत त्याच कड्यावरून उडी घेतली.एका मिनिटात एक संपूर्ण कुटुंब संपलं.ही घटना मन सुन्न करणारी आहे. पण ही केवळ एका कुटुंबाची आत्महत्या नाही. ही घटना आजच्या कुमारवयीन मुलांच्या आयुष्याकडे पाहण्याच्या पद्धतीकडे लक्ष वेधणारी एक गंभीर आणि सूचक घटना आहे.आत्महत्या आणि डिप्रेशन हे मानसिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहेत. त्यावर उपचार शक्य आहेत. मात्र, गेल्या दोन दशकांत आपण मुलांच्या मनाला ज्या काही सवयी लावल्या आहेत, त्यांचाही त्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला आहे.पूर्वी १६व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय पराक्रम केला, हे मुलांना सांगितलं जायचं. आज तसं सांगण्याचे दिवस कदाचित बदलले आहेत. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलांना आयुष्य जगण्याची मानसिक ताकद आपण देतोय का?आज मुलांना अगदी लहान वयापासून Instant Gratificationची सवय लागते आहे. म्हणजे हवी ती गोष्ट, हवा तो आनंद आणि हवं ते समाधान ताबडतोब मिळालं पाहिजे, अशी मानसिकता. आणि जेव्हा ती गोष्ट लगेच मिळत नाही, तेव्हा निराशा येते. निराशेतून अस्वस्थता वाढते आणि त्या अस्वस्थतेतून विचारांवरचा ताबा सुटण्याची शक्यता निर्माण होते.इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन → अपेक्षा → गोष्ट न मिळाल्याने निराशा → अस्वस्थता → विचारांवरचा ताबा सुटणेया चक्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर समाजमन अडकलेलं आहे. फोन हे त्याचं एक निमित्त असू शकतं. पण प्रश्न फक्त फोनचा नाही. प्रश्न आहे तो मुलांना प्रत्येक वेळी त्यांच्या मनासारखं मिळण्याची सवय लावण्याचा.मुलं स्वयंपूर्ण होईपर्यंत त्यांना प्रत्येक गोष्ट सहज मिळेलच असं नाही, हे त्यांना शिकवणं गरजेचं आहे. कधी दहापैकी नऊ वेळा ‘नाही’ आणि एकदाच ‘हो’, असंही असलं पाहिजे. ही सवय अगदी चौथ्या-पाचव्या वर्षापासून लागणं गरजेचं आहे. यासोबतच आपण रोजच्या आयुष्यात आनंदाचे स्रोत कोणते ठेवतो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.मानसशास्त्राच्या दृष्टीने आनंदाचे दोन मोठे स्रोत आपण पाहू शकतो. एक म्हणजे तातडीने एखादी गोष्ट मिळाल्यावर मिळणारा आनंद — डोपामाईन. आणि दुसरा म्हणजे दीर्घकाळ प्रयत्न करून, कष्ट करून, एखादं ध्येय गाठल्यानंतर मिळणारा आनंद.पहिल्या प्रकारात खरेदी, मोबाईल, टीव्ही, वेब सिरीज किंवा सतत मनोरंजन यांसारख्या गोष्टी येतात. यासाठी फारसा शारीरिक किंवा मानसिक कष्ट करावा लागत नाही. पण दुसऱ्या प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात, अपयश स्वीकारावं लागतं आणि कष्ट घ्यावे लागतात.आजच्या आयुष्यातला कष्ट करून आनंद मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्यायाम. पण दुर्दैवाने कुमारवयीन मुलांच्या आयुष्यातून व्यायाम, मैदानी खेळ आणि शारीरिक कष्ट हळूहळू कमी होत चालले आहेत. यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे — नकाराला आपण कसं सामोरं जातो? हे ठरवतं आपलं Mental Resilience — मानसिक लवचिकता आणि संकटातून सावरण्याची क्षमता.एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही, परिस्थिती आपल्या मनासारखी घडली नाही, तरीही आपण स्थिर राहू शकतो का?हीच मानसिक ताकद. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की, जे हवं ते मिळवणं आजवर राम आणि कृष्णांनाही शक्य झालं नाही. पुरुषोत्तम म्हणून जन्माला आलेल्या त्यांनाही आयुष्यभर अनेक संकटं आणि कष्ट सोसावे लागले.मग आपण मर्त्य मानव आहोत.आपल्या आयुष्यात संकटं येणारच आहेत, हे गृहीत धरून त्यांना तोंड देण्याची मानसिक शक्ती प्रत्येकामध्ये निर्माण करावी लागेल. आणि ही शक्ती आपोआप तयार होत नाही. ती कुटुंबातून, संस्कारातून आणि रोजच्या छोट्या-छोट्या सवयींतून तयार होते. म्हणूनच पूर्वी आपल्याला पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायला सांगितलं जायचं. कारण ते कठीण असतं. झोपावंसं वाटत असताना उठणं, कंटाळा असताना व्यायाम करणं, आवडत नसतानाही एखादं आवश्यक काम पूर्ण करणं — दिवसभरातील अशा छोट्या-छोट्या कठीण गोष्टी आपल्या मेंदूला अस्वस्थतेशी जुळवून घेण्याचं प्रशिक्षण देतात. तुम्हाला मन थोडं अस्थिर वाटत असेल किंवा लो वाटत असेल आणि तुम्ही गार पाण्याने अंघोळ केली, तर काही वेळाने बरं का वाटतं? कारण त्या क्षणी तुमचं शरीर आणि मन अनकम्फर्टेबल परिस्थितीत राहण्याचं प्रशिक्षण घेत असतं. आणि हीच मानसिक ताकद पुढे मोठ्या संकटांचा सामना करताना उपयोगी पडते.आता शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट — Amygdala Hijack. आपल्या मेंदूमध्ये ॲमिग्डाला हा भावनिक प्रतिक्रियांशी संबंधित महत्त्वाचा भाग आहे. एखादी भावना अचानक अत्यंत तीव्र झाली, तर आपण विचार न करता लगेच कृती करण्याच्या अवस्थेत जाऊ शकतो. राग, भीती, संताप किंवा निराशेच्या भरात आपण काहीतरी टोकाचं करण्याच्या तयारीत असतो.अशा वेळी सर्वात महत्त्वाचं आहे — थांबणं. फक्त काही सेकंद स्वतःला दिले, तरी तीव्र भावनिक प्रतिक्रिया कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणून अशा वेळी तीन गोष्टी करा;पहिली — हळू आणि खोल श्वास घ्या.दुसरी — ९० पासून १ पर्यंत उलटी आकडेमोड करा.तिसरी — तुम्हाला जाणवत असलेल्या भावनेला नाव द्या.“मला राग आला आहे.”“मला भीती वाटते आहे.”“मला खूप निराश वाटतंय.”या तीन साध्या गोष्टी आपल्याला त्या क्षणापासून थोडं दूर घेऊन जातात आणि पुन्हा विचार करण्यासाठी वेळ देतात.पण ही गोष्ट मुलांना एकदा सांगून समजणार नाही. ती त्यांना वारंवार शिकवावी लागेल आणि प्रत्यक्ष करून दाखवावी लागेल.मुलं जेव्हा आक्रमक होतात, रागावतात किंवा लगेच प्रतिक्रिया देतात, तेव्हा त्यांच्यावर ओरडण्याऐवजी आपण त्यांना भावनांचं नियमन कसं करायचं, हे शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भावना चुकीच्या नसतात.पण त्या भावनेतून आपण काय कृती करतो, हे महत्त्वाचं असतं.छत्रपती संभाजीनगरच्या त्या डोंगराच्या कड्यावर घडलेली घटना एका मिनिटात एका कुटुंबाला घेऊन गेली. अशी घटना कोणाच्याही कुटुंबात घडू शकते. पण ती घडू नये. आणि पुन्हा पुन्हा अशा घटना पाहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी आपण आपल्या मुलांना केवळ चांगलं शिक्षण देऊन भागणार नाही. त्यांना भावनिक शिक्षण द्यावं लागेल. त्यांना नकार स्वीकारायला शिकवावं लागेल. कष्ट करायला शिकवावं लागेल. थांबायला शिकवावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे — अत्यंत तीव्र भावनेच्या क्षणी विवेकाने निर्णय घ्यायला शिकवावं लागेल. कारण आज आपल्या मुलांना केवळ यशाचे मंत्र देण्याची गरज नाही. त्यांना संकटातही स्वतःला सावरण्याचे भावनिक मंत्र देण्याची गरज आहे. हा मंत्र प्रत्येक घरात पोहोचणं गरजेचं आहे. कुमारवयीन मुलांसाठीही आणि त्यांच्या पालकांसाठीही.— डॉ. अमोल अन्नदाते9421516551

