आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत केंद्रप्रमुख…. रतन जगताप
येळवी / प्रतिनिधी : अभय लांडगे
श्री संत ज्ञानेश्वर आश्रम शाळा, येळवी येथे इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला निगडी खुर्द केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रतन जगताप साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल, येळवीचे प्राचार्य श्री. नंदकुमार खंडागळे, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. महेश बाबानगर, वर्गशिक्षक श्री. सिद्धराया हूबनूर यांच्यासह सिद्धाराया निवर्गी, अतुल गडदे, निलाप्पा होरतीकर, संतोष पडळकर, धनाजी कुलाळ, दत्तात्रय खर्जे, अपरीन मणियार मॅडम, अधीक्षक दत्तात्रय धोत्रे, गंगप्पा तेली, अभय लांडगे, सयंपाकी बाळुबाई पुकळे, राजाक्का गुजले, भामाबाई कोळेकरआदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय मंथन परीक्षेत राज्यात १६ वा व केंद्रात प्रथम क्रमांक मिळवणारी इयत्ता दुसरीतील कुमारी समृद्धी विठ्ठल यादव तसेच इयत्ता चौथीतील कुमारी गौरी गोविंद खांडेकर हिने राज्यात ६९ वा व केंद्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.निरोप समारंभात सातवीतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अबोली अडगळे, करिष्मा हिप्परकर आणि विशाल कांबळे यांनी “शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि शिक्षण आम्ही कधीही विसरणार नाही, शाळा नेहमी आमच्या हृदयात राहील,” अशा भावना व्यक्त केल्या.यावेळी प्रमुख पाहुणे श्री. रतन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात संस्कार आणि चांगल्या मूल्यांचे महत्त्व खूप मोठे आहे.
उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा योग्य उपयोग करून दर्जेदार शिक्षण घ्यावे, पुस्तकांशी मैत्री करावी आणि अवघड विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. तसेच स्वतःची आणि आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले.प्राचार्य श्री. नंदकुमार खंडागळे यांनी शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षणाची गरज अधोरेखित करत प्रामाणिक, कष्ट आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक श्री. महेश बाबानगर यांनी सातवीतील विद्यार्थ्यांनी सात वर्षांच्या प्रवासातील आठवणींना उजाळा देत त्यांना भावनिक शुभेच्छा दिल्या. वर्गशिक्षकांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अतुल गडदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अपरीन मणियार मॅडम यांनी मानले.

