मूकनायक/अमोल भालेराव.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.
वणी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक करून वणी पोलिसांनी तत्परता आणि कर्तव्यदक्षतेचे उदाहरण दाखवून दिले आहे.या संपूर्ण कारवाईत गायत्री जाधव (सहाय्यक पोलिस निरीक्षक, वणी पोलीस ठाणे) यांनी महत्त्वाची भूमिका बजावत आरोपीला ताब्यात घेतले.हि सर्व कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील व कळवण पोलिस उपअधीक्षक विजय कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार,या प्रकरणातील गुन्हा सुरुवातीला म्हसरूळ ( नाशिक शहर ) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.मात्र, घटनाक्रम वणी येथे घडला होता तसेच पीडिता ही वणीची रहिवासी असल्यामुळे पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी हा गुन्हा वणी पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने वर्ग करण्यात आला.
दरम्यान,आरोपी फरार झाल्यानंतर काही सामाजिक संघटनांकडून पोलिसांवर आरोपीला सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नसल्याचे सांगत काहींनी वणी पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे परिसरातील नागरिकांचेही लक्ष लागले होते.
मात्र या सर्व आरोपांना प्रत्यक्ष आपल्या कृतीतून उत्तर देत वणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.सपोनी गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून आरोपीचा माग काढला आणि अवघ्या २४ तासांच्या आत त्याला जिल्हा बाहेरून अटक करण्यात यश मिळवले.
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पोलिस दलाची कार्यक्षमता आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.विशेषतः अल्पवयीन मुलीवरील अत्याचारासारख्या गंभीर प्रकरणात तत्परतेने कारवाई केल्याने नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गात वणी पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
या कारवाईबद्दल वणी परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांचे तसेच सपोनी गायत्री जाधव यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.तसेच अशा प्रकारे तातडीने कारवाई करून न्याय मिळवून देण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांचे वणीकर नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

