नळदुर्ग( प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी नळदुर्ग ता. तुळजापूर येथील परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.
मारुती बनसोडे यानी सन १९९o -९१ मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी वर्षात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी १०१ व्याख्यानाचा संकल्प केला व तो संकल्प त्यानी पूर्ण ही केला.त्यानंतर चिवरीच्या पशुहत्या विरोधी आंदोलनातील ते सक्रिय सहभागी झाले होते. दि. ०४ ऑगस्ट १९९६ ला तुळजापूर येथे त्यानी पुढाकार घेवून मराठवाडा पातळीवरील पोतराज प्रथा निर्मूलन निर्धार परिषद घेतली. अंधश्रध्दा निर्मल समितीचे संस्थापक कार्याध्याक्ष कै.डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यासोबत त्यानी दहा वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यानंतर परिवर्तन सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या माध्यमातूनही धाराशिव जिल्ह्यात परंडा ,कळंब, तुळजापूर, लोहारा इत्यादी तालुक्यात त्यांनी विविध विषयावर काम केले आहे. नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा संघटक म्हणून ते गेली तीन-चार वर्षे काम करीत आहेत. सन २०२३ – २४ या कालावधीत व्यसनमुक्तीसाठी धाराशिव जिल्हयात अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार – २o२३ – २४ साठी निवड करण्यात आली आहे.सदर निवडी संर्भात दि.१८ मार्च २o२६ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने एक जीआर काढलेला असून त्यामध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.धाराशिव जिल्ह्यातून एकमेव त्यांची या पुरस्कारासाठी निवडीबद्दल परिसरातून अनेकांनी त्यांना शुभेच्छा देवून आभिनंदन केले आहे.

