Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रराज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनीहयातीचे दाखले त्वरीत सादर करावेत

राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनीहयातीचे दाखले त्वरीत सादर करावेत

रेणुका गायकवाड- महाले, नाशिक ,ब्युरो चीफ .

नाशिक, दि. 28 ऑक्टोबर, 2024 : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचा हयात असल्याचा दाखला व ६० वर्षाखालील कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी पुनर्नियुक्तीचे/ पुनर्विवाह/ विवाह बाबतचे घोषणापत्र १ नोव्हेंबर २०२४ रोजी संबंधित बँकेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोशागार अधिकारी महेश बच्छाव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांचा हयात असल्याचा दाखला व ६० वर्षाखालील कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी पुनर्नियुक्तीचे/ पुनर्विवाह/ विवाह बाबतचे घोषणापत्र दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी बँकेमार्फत स्वीकृत करण्यात येतात. सदरचे दाखले विहित मुदतीत कोशागारास प्राप्त न झाल्यास पुढील निवृत्तीवेतन कोशागाराकडून रोखण्यात येते. निवृत्तीवेतन रोखले जाऊ नये यासाठी विहीत मुदतीत सदर दाखले सादर करणे आवश्यक आहे.

यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेत प्रत्यक्ष हजर राहून हयातीच्या दाखल्यावर अथवा बँकेकडे कोशागाराने पुरविलेल्या यादीवर स्वाक्षरी करावी. ही बाब बँक व्यवस्थापकाने प्रमाणित करणे आवश्यक आहे. बँक व्यवस्थापकांनी एकत्रित यादी ३० नोव्हेंबर २०२४ अखेर कोशागारात सादर करावी. कोशागाराकडून बँकेस विहित विवरणपत्रे संवितरीत करण्यात आहे.

ज्या निवृत्तीवेतनधारकांना बँकेत जाता आले नाही त्यांना खालील पर्याय उपलब्ध आहेत.
• राज्य शासनाच्या कोणत्याही राजपत्रित अधिकाऱ्याने सही व शिक्क्यासह साक्षांकीत केलेला हयातीचा दाखला कोशागारास सादर करता येईल.
• https://jeevanpramaan.gov.in या वेबपोर्टलद्वारे घरबसल्या हयातीचा दाखला ऑनलाईन साद करता येईल. जीवनप्रमाण पोर्टलवर हयातीचा दाखला ऑनलाईन सादर करण्याची कार्यपद्धती https://www.youtube.com/watch?v=nNMIKTYqTF8 या You tube या माध्यमावरीन लिंकवर उपलब्ध आहे
• भारतीय डाक विभागाने India Post Payment Bank (IPPB) च्या माध्यमातून डिजिटल हयातीचा दाखला ऑनलाइन सादर करण्याची सुविधा सशुल्क उपलब्ध करून दिलेली आहे.
• विदेशात वास्तव्यास असणारे निवृत्तीवेतनधारक/ कुटुंबनिवृत्तीवेतनधारक भारतीय दुतावास भारतीय उच्च आयुक्तालय अथवा भारतीय वाणिज्य दूतावास येथील प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत हयातीचा दाखला सादर करू शकतील.

वरील बाबींसाठी तांत्रिक मार्गदर्शन हवे असल्यास जिल्हा कोशागार कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखेत संपर्क साधावा किंवो ०२५३-३१६६८३ या निवृत्तीवेतन शाखेच्या दूरध्वनीवर संपर्क साधावा. उपरोक्त प्रमाणे ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत ज्यांचे हयातीचे दाखले कोशागार कार्यालयास प्राप्त होणार नाहीत, त्यांचे डिसेंबर २०२४ चे निवृत्तीवेतन संगणक प्रणालीद्वारे आपोआप थांबविले जाणार असल्याचेही, जिल्हा कोशागार अधिकारी श्री. बच्छाव यांनी कळविले आहे.
००००००

- Advertisment -

Most Popular

Recent Comments