खालापुर ( गोपिनाथ सोनावणे) रसायनी वासंबे विभागात नवीन पोसरी गावामध्ये शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेला सुद्धा रस्ता न दिल्याने माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवीन पोसरी गावामध्ये खारकर आळी मध्ये खंडू हाल्या खारकर आणि रघुनाथ शंकर पाटील हे शेजारी शेजारी राहत असून खंडू खारकर आणि इतर शेजारी यांचा वहिवाटीचा रस्ता रघुनाथ शंकर पाटील यांच्या दारातून आहे परंतु काही महिन्यापासून कोणताही कायदेशीर अधिकार नसताना रघुनाथ शंकर पाटील यांनी हा वहिवाटीचा रस्ता बंद केला होता. हा वहिवाटीचा मार्ग पुन्हा मोकळा व्हावा यासाठी खारकर आळीतील नागरिकांनी ग्रामपंचायत वासंबे पंचायत समिती खालापूर तहसीलदार खालापूर यांच्याकडे अर्ज निवेदन पाठपुरावा केला. तसेच काही महिन्यापर्वी पंचायत समिती खालापूर येथे उपोषण देखील केले सदर उपोषण स्थगित करण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन देखील दिले होते. परंतु मागील तीन महिन्यांत कोणतीही करवाई केली नाही त्यातच खंडू खारकर यांचे दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी निधन झाले.
खंडू खारकर यांची अंत्ययात्रा नेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी रघुनाथ शंकर पाटिल यांना तात्पुरता रस्ता खुला करण्यासाठी विनंती केली परंतु रघुनाथ पाटील आणि त्यांचा मुलगा नितेश पाटील यांनी स्पष्ट नकार दिल्याने खंडू खारकर यांची अंतिम यात्रा नातेवाईकांनी भिंतीवरून उचलून नेली. अशा प्रकारच्या शेजाऱ्याच्या वागणुकीमुळे रघुनाथ पाटील आणि त्यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई ची मागणी होत आहे. तहसीलदारांनी या विषयामध्ये योग्य न्याय निर्णय लवकरात लवकर करून वहिवाट मोकळी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.

