Thursday, February 26, 2026
Homeराजकारणअ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला तुडूंब गर्दी; लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांचे राजकीय गणित बिघडणार?

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला तुडूंब गर्दी; लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांचे राजकीय गणित बिघडणार?

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला तुडूंब गर्दी; लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांचे राजकीय गणित बिघडणार?

पिंपरी : वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर सभा घेणारे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांची पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (दि. 28) झालेली सभा गाजली. या सभेला जनसागर लोटला होता. डॉ. आंबेडकर यांची पिंपरी-चिंचवडमध्ये गर्दीचा उच्चांक मोडणारी ही पहिलीच सभा ठरली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीत उत्साहाचे वातावरण आहे. या आघाडीत बारा बलुतेदार महासंघही सामील झाल्याने अन्य प्रस्थापित राजकीय पक्षांना निश्‍चितच विचार करावा लागणार आहे. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला आणि होणार्‍या गर्दीचे मतात रुपांतर करण्यात आघाडीला यश आले, तर प्रस्थापित राजकारण्यांची राजकीय गणिते बिघडण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. या निवडणुकीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसी यांना सोबत घेऊन वंचितांची मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये सध्या तरी त्यांना यश आल्याचे चित्र आहे. डॉ. प्रकाश आंबेडकर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये जाहीर सभा घेत आहेत. या सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक शहरात तर डॉ. आंबेडकर यांच्या सभा गर्दीचा उच्चांक मोडताना दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीची सोमवारी (दि. 28) पिंपरी-चिंचवडमध्येही सभा पार पडली.

पिंपरी, नेहरूनगर येथील एच. ए. मैदानावर झालेल्या या सभेला एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आले नाहीत. परंतु, डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेला नागरिकांनी तुडूंब गर्दी केली होती. दुपारी तीन वाजता होणारी सभा सायंकाळी सहा वाजता सुरू झाली तरीही नागरिकांची सभेला तुफान गर्दी होती. सुरूवातीला प्रमुख पदाधिकार्‍यांच्या भाषणानंतर रात्री आठच्या सुमारास डॉ. प्रकाश आंबेडकर हे भाषणासाठी उभे राहिले. भाषणातील त्यांच्या प्रत्येक वाक्याला नागरिकांमधून टाळ्या वाजवून आणि घोषणा देत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने पिंपरी-चिंचवडमधील पहिल्याच जाहीर सभेत राजकीय मैदान मारल्याचे चित्र होते.

वंचित बहुजन आघाडीमध्ये बारा बलुतेदार महासंघही सामील झाला आहे. या महासंघात सर्वच ओबीसींचा समावेश आहे. त्यामुळे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या पिंपरीतील सभेला झालेली गर्दी बरेच काही सांगणारी आहे. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्यास दोन्ही मतदारसंघात निवडणूक निकालाचे चित्र बदलण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभेला झालेल्या गर्दीचे मतात रुपांतर करण्यात आघाडीच्या पदाधिकार्‍यांना यश मिळाले, तर या दोन्ही मतदारसंघातील अनेक प्रस्थापित राजकारणी आडवे होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments