*विधी महाविद्यालयातील प्रकार: लेक्चर न करता डिग्री देण्याचा उपक्रम, अपात्र विद्यार्थ्यांची डिग्री रद्द करावी*.
सांगली दि. १२ : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत ८ विधी महाविद्यालय आहेत. यामध्ये तीन तसेच पाच वर्ष एलएलबी कोर्स, एलएलएमचे शिक्षण देण्यात येते. विश्वविद्यालय अनुदान आयोग, बार कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या नियामानुसार हे नियमित अभ्यासक्रम आहे, दूरस्थ शिक्षण नाही. विद्यार्थ्यांनी नियमित वर्ग करणे व ७५ टक्के हजेरी असणे बंधनकारक आहे. मात्र हे नियम धाब्यावर बसवून घरात बसून डिग्री मिळवून देण्याचा अभिनव उपक्रम संबधित महाविद्यालयाकडून मागील चार सेमिस्टर पासून राबविण्यात येत आहे. याची चौकशी होऊन दोषी महाविद्यालयावर कारवाई होणेबाबत रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम यांनी विश्वविद्यालय अनुदान आयोग यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत एस.यु.अनुभाग युजीसी यांनी शिवाजी विद्यापीठास याबाबत कारवाईचे आदेश दिले. याबाबत कोणती कारवाई विद्यापीठाने केली याचे पत्र तक्रारदार यास देण्याचे सांगितले आहे. मागील दोन वर्षातील विद्यार्थीच्या हजेरी तपासावे आणि अपात्र विद्यार्थ्यांची डिग्री रद्द करावी.
विधी शाखेचे अनेक विद्यार्थी हे शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरीत पूर्ण वेळ सेवेत आहेत, असे असताना ते एकाच वेळी नोकरीच्या ठिकाणी तसेच लेक्चर करिता महाविद्यालयीन वेळी कसे उपस्थित असू शकतात. यातून ते शासनाची उघडपणे फसवणूक करत आहेत. यासोबत नियमित लेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकूण पटसंख्येपेक्षा कमी आहे. संबधित विधी महाविद्यालय हे अशा पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरून घेणे, इंटर्नल मार्क्स देणे तसेच परीक्षेला बसून देत आहेत, निकाल देऊन उत्तीर्ण केले जात आहे ही गंभीर बाब आहे. माहिती अधिकारात मागितलेली माहिती दडपण्याचा प्रकार होत आहे. विद्यापीठाने कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा अमोल वेटम यांनी दिला.

