Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्षनेता निवडताच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार ? अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा.

विरोधी पक्षनेता निवडताच काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार ? अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा.

मूकनायक न्यूज नेटवर्क
(मूकनायक प्रतिनिधी.गणेश मच्छिंद्र भोसले )

State President Of Congress :

Maharashtra Congress : काँग्रसेची दोन्ही महत्वाची पदे विदर्भाकडेच !

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्ष पदानंतर आता विरोधी पक्षनेते पदही विदर्भातच गेल्याने काँग्रेसची विदर्भावर खूपच मर्जी आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. परिणामी काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षच बदलाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसकडील दोन्ही विरोधी पक्षनेता आणि प्रदेशाध्यक्ष पद ही दोन्ही महत्वाची पदे पूर्व विदर्भातील नेत्यांना देण्यात आलेली आहेत. नवनियुक्त विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोघेही पूर्व विदर्भातील आहेत. त्यामुळे आता दोन्ही पदे पूर्व विदर्भात ठेवली जाणार की प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चेत प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक आहेत. परिणामी या पदासाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशोक चव्हाण हे गांधी कुटुंबियांचे निकटवर्तीय मानले जातात. मागील काही काळापासून मात्र ते नाराज असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बदलाची वेळ आलीच तर हे पद कुणाकडे जाणार याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

वडेट्टीवारांच्या निवडीतून काँग्रेसने ‘ओबीसी’ कार्डाची खेळी केल्याचे बोलले जात आहे. पुढील वर्षी देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पद वाटपात जात आणि प्रदेशांबाबत समतोल साधून सोशल इंजिनियरिंगचा प्रयोग करण्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकांसाठी राज्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लगाले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments