मूकनायक विशेष | मुंबई प्रतिनिधी | प्रकाश लांडगे
उपवर्गीकरण हे भावाभावांत भांडणे लावून बौद्ध धर्मांतर रोखण्याचे षडयंत्र – ॲड. डॉ. एस. के. भंडारे
बुलढाणा (संघसेन प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ मे १९२९ रोजी तत्कालीन जळगाव जामोद (सध्याचा संग्रामपूर) तालुक्यातील पातुर्डा येथे सहकारी बक्षीराम दाभाडे यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी पातुर्डा येथे अस्पृश्यांची परिषद घेतली तसेच गावातील विहीर सर्व समाजासाठी खुली केली होती.

याच ऐतिहासिक स्थळी त्यांनी एका शाळेत एक दिवस वास्तव्यही केले होते.या ऐतिहासिक वारशाचे जतन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले असून शाळा व विहीर परिसरात सभागृहांची उभारणी करण्यात आली आहे. शाळेजवळील ग्रंथालय सभागृहात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), जिल्हा बुलढाणा अंतर्गत संग्रामपूर तालुका शाखेच्या वतीने दिनांक २० मे ते २९ मे २०२६ या कालावधीत दहा दिवसीय श्रामणेर-बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचा समारोप २९ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद हायस्कूल, पातुर्डा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमीवर संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड. डॉ. एस. के. भंडारे उपस्थित होते.समारोपापूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या जिल्हा परिषद शाळेस तसेच सर्वांसाठी खुली केलेल्या ऐतिहासिक विहिरीस अभिवादन केले.

त्यानंतर समता सैनिक दलाची सलामी स्वीकारून उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना ॲड. डॉ. भंडारे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतील क्रांतिकारी सहकाऱ्यांच्या वारसांना सलाम करण्यासाठी येथे आलो आहे. या भूमीतून मिळणारी प्रेरणा आम्हाला बाबासाहेबांची सामाजिक क्रांती अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी बळ देते. बाबासाहेबांचे अपूर्ण कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी ‘मिशन २५’ प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.”उपवर्गीकरण आणि बौद्ध जनगणना या विषयांवर सखोल मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “उपवर्गीकरण हे भावाभावांत भांडणे लावून बौद्ध धर्मांतर रोखण्यासाठी रचलेले षडयंत्र आहे.” तसेच जनगणनेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्पष्ट केले की, खासदार, आमदार, नगरसेवक यांसारख्या लोकप्रतिनिधींची संख्या जनगणनेच्या आकडेवारीवर अवलंबून असते.

त्यामुळे जोपर्यंत बौद्ध समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत जनगणनेत धर्म ‘बौद्ध’, जात पूर्वाश्रमीची जात जसे महार, मांग, चांभार इत्यादी नमूद करावी आणि अवगत भाषांमध्ये पाली भाषेचाही समावेश करावा.कार्यक्रमात राज्य संघटक भीमराव तायडे, जिल्हाध्यक्ष एस. एस. वले आणि उपाध्यक्ष के. के. शेगोकार यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिबिरार्थींनी मनोगते व्यक्त करून प्रशिक्षणाचा अनुभव कथन केला.शिबिराचे उपाध्याय म्हणून बौद्ध महासभा भिक्खू संघ, चैत्यभूमीचे भंते सारिपुत्त (सोलापूर) यांनी तर शिबिर प्रमुख व केंद्रीय शिक्षक म्हणून ज्ञानोबा कांबळे (पुणे) यांनी दहा दिवस प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष ॲड. अमोल खंडेराव होते. सूत्रसंचालन तालुका सरचिटणीस मिलिंद वानखडे यांनी केले, तर प्रास्ताविक तालुका कोषाध्यक्ष निलेश लहासे यांनी केले.यावेळी ॲड. डॉ. एस. के. भंडारे आणि भंते सारिपुत्त यांच्या हस्ते शिबिरार्थींना श्रामणेर प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.तसेच ‘बुद्ध-बाबासाहेब पाऊलखुणा’ या पुस्तिकेसाठी नागपूर पूर्व विभाग जिल्हा शाखेचे अध्यक्ष सुनिल सावंत यांनी पाच हजार रुपयांची देणगी जाहीर केली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका संस्कार उपाध्यक्ष उदयभान दांडगे, संरक्षण उपाध्यक्ष रत्नदीप खंडेराव, संरक्षण सचिव आकाश वानखडे, संघटक विशाल दामोदर, प्रशांत तायडे, गौतम इंगळे, सामाजिक कार्यकर्ते मेजर साहेबराव वानखडे, सुमेध वानखडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धविहार समितीचे अध्यक्ष कैलास दाभाडे, समता सैनिक दलाचे राहुल खंडेराव, धम्मपाल वानखडे, वाकोडे तसेच सर्व केंद्र शिक्षक, वरिष्ठ केंद्र शिक्षक, दानदाते, उपासक-उपासिका, स्वयंसेवक आणि समाजबांधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

या श्रामणेर-बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिरामुळे परिसरात धम्मजागृती, नैतिक मूल्यांची रुजवण, सामाजिक ऐक्य आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. शिस्त, संस्कार आणि धम्मज्ञानाचा संगम घडविणारे हे शिबिर सर्वार्थाने यशस्वी ठरले.

