मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे,
कोल्हापूर, दि. 11 : राज्यातील बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान योजना 2025-26 राबविण्यात येत आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयान्वये ही योजना अंमलात आणली जात असून, याअंतर्गत पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
या योजनेसाठी राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि संस्थेमध्ये 51 टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य असलेल्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था पात्र ठरणार आहेत. पात्र संस्थांना कमाल 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
7 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार या योजनेअंतर्गत एकूण 13 प्रकारच्या पायाभूत सोयी-सुविधांचा समावेश आहे. यामध्ये इमारतीचे किरकोळ नुतनीकरण व डागडुजी, शुद्ध पेयजल सुविधा, ग्रंथालय/वाचनालय/अभ्यासिका अद्ययावत करणे, संगणक कक्ष उभारणे, कार्यशाळा किंवा सभागृह खोलीचे बांधकाम, सुशोभीकरण व नुतनीकरण तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांचा समावेश आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 20 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा अल्पसंख्यांक अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.
प्राप्त प्रस्तावांची छाननी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करण्यात येणार असून, अंतिमरित्या पात्र ठरणाऱ्या संस्थांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे सादर केले जाणार आहेत. 20 फेब्रुवारीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन समितीमार्फत कळविण्यात आले आहे.

