शफिक शेख, प्रतीनिधी, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
पिंपरी, दि.२६ :- महापालिकेच्यावतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. यामध्ये वाहतुकीच्या समस्या, महिलांच्या शौचालयांची दुरावस्था, गणपती मंडळ परवानगीसाठी लागणारा विलंब, शहरातील खड्ड्यांची डागडुजी करणे, गणपती काळात मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण, भाजीपाला मार्केटसाठी प्रशस्त जागा, गणेशोत्सव काळात वाहतुकीचे नियोजन, शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर उड्डाणपूल अशा अनेक तक्रारींचा समावेश होता.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात तक्रारींचा पाढा नागरिकांनी उपस्थित राहून वाचला. ऑगस्ट महिन्याच्या चौथ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.

