मुकनायक नवी मुंबई वृत्तसेवा
नवी मुंबई –नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या १६४ कामगारांच्या कायम स्वरुपी नियुक्तीचा प्रश्न सध्या अडगळीत सापडला आहे. नवी मुंबईततील स्थानिक दोन आमदारांमध्ये सुरू असलेल्या श्रेयवादाच्या चढाओढीमुळे या कामगारांचे भविष्य अधांतरी राहिले असून, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक संतोष सुतार काँग्रेस ओबीसी सेल नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष यांनी नुकतीच उपायुक्त (प्रशासन) शरद पवार यांची भेट घेतली.
संतोष सुतार यांनी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी मंत्रालयात नगरविकास विभागातही भेट देऊन निवेदन सादर केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे कर्मचारी गेली अनेक वर्षे निष्ठेने सेवा देत आहेत. त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती देण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा, ही आमची ठाम मागणी आहे.”
या नियुक्तीप्रकरणात स्थानिक पातळीवर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील दोन आमदारांमध्ये कोणत्या गटाला या नियुक्तीचे श्रेय मिळावे यावरून मतभेद असल्याने कामगारांची फाइल रखडलेली आहे. या राजकीय कुरघोडीत मात्र, कंत्राटी कामगारांना मोठ्या मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे.
“कामगारांनी आपले कर्तव्य चोख पार पाडले असून, त्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे. ही त्यांच्या जीवनमानाशी आणि कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासोबत निगडीत बाब आहे. राजकारण बाजूला ठेवून या निर्णयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे,” असे संतोष सुतार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कंत्राटी कामगारांनी देखील आपली मागणी ठामपणे मांडण्यास सुरुवात केली आहे. जर लवकरच ठोस निर्णय झाला नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा काही कामगार संघटनांनी दिला आहे.या सगळ्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने तसेच नगरविकास विभागाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर निर्णय घेणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. अन्यथा, ही बाब आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

