Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडरहाटणीतील कन्या शाळा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने लगबगली; खाऊ आणि पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे...

रहाटणीतील कन्या शाळा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने लगबगली; खाऊ आणि पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत पिढी घडविण्याची जबाबदारीही शिक्षकांची – मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन

पिंपरी चिंचवड : शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले स्वागत फलक…, विद्यार्थ्यांना खाऊ आणि पुष्प देत शाळेत स्वागत करणारे शिक्षक…, नवीन करकरीत पाठ्यपुस्तकांचे करण्यात आलेले वाटप…, चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेत मन रमण्यासाठी ठेवण्यात आलेली विविध अभ्यासपूर्ण खेळणी…या प्रसन्न वातावरणात आज (सोमवारी) रहाटणी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कन्या शाळा क्र.५५ मध्ये विद्यार्थ्यांचा प्रवशोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी ‘ग’ प्रभागचे माजी अध्यक्ष तथा माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते नरेश खुळे यांच्या उपस्थितीत इयत्ता १ली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, खाऊ आणि गुलाबपुष्प देण्यात आले.

यावेळी बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, आज शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आहे. आणि या खास प्रसंगी तुम्हा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे नवीन स्वप्ने, नवीन संधी आणि नवीन आव्हानांचा एक सुंदर प्रवास! आज आपण सर्वजण एका नव्या उत्साहाने आणि जोमाने या प्रवासाला सुरुवात करत आहोत. ही चिमुकले विद्यार्थी कोरी पाटी आहे. या पाटीवर शिक्षणाबरोबरच संस्काराचे धडे गिरवून भविष्यात सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढी घडविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे, यावेळी ते म्हणाले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र सुराणा, शाळेच्या मुख्याध्यापिका रजनी आहेर यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर पवार यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments