Thursday, February 26, 2026
Homeलेखहिंदुत्वाची भयंकरता ; ...

हिंदुत्वाची भयंकरता ; मध्यप्रदेश प्रयोगशाळा !

           

     मध्यप्रदेशची नवी ओळख आकार घेतेय. 'हिंदुत्वाची प्रयोगशाळा !'. इथली सत्ता हा प्रयोग करतेय. त्यात सातत्य आहे. रोज जे कानावर येतेय ते त्याचेच दाखले समजावेत. 

     इथे राज्य भाजपचे आहे. एकछत्री राज्य ! दीर्घ वर्षे झालीत. संघाचा प्रभाव आहे. सध्या मुख्यमंत्री मोहन यादव हे आहेत. दक्षिण उज्जैन येथून निवडून येतात. तिसरी वेळ आहे. बी एससी सी , एम बी ए , पीएच डी आहेत. विद्यार्थी परिषदेतून आले. साठ वर्षाचे आहेत.

     मोहनराव जोरात आहेत. सारे ठरवून सुरू आहे.अलीकडे नामांतराचा सपाटा लावलाय. गाव , शहर , वस्ती , ठिकाण ची मुस्लिम नावे पुसून टाकायची. तशी लाट आलीय. की आणलीय ? लोकांनी मागणी केली की नाव बदलले. असे सुरुय. नवे नाव हिंदूधार्जिणी ! मुख्यमंत्री तिथेच घोषित करतात. सपाटा लागलाय.

     या सपाट्यात मुरादपुरचे मुरलीपूर , इस्लामनगरचे इश्वरपूर , अलीपुरचे रामपूर , नबीपुरचे नयापूर , मिर्झापूरचे मीरापूर , मुरादपुरचे मुरलीपूर , हैदरपुरचे हिरापूर , शमशाबादचे श्यामपूर नावे झालीत. अशी शेकडो नावे बदलण्यात आली आहेत. ते सुरुच आहे.

     याशिवाय रस्त्याची नावे बदलली. नवी नावे राम पथ , सीता पथ , लक्ष्मण पथ , भरत पथ , कन्हैया पथ , अशी झालीत. जुन्या मंदिराचे पुनर्निर्माण जोरात सुरु आहे. नवीन मंदिर निर्माणाचा झपाटा लागलाय.

हिंदुत्वाची झिंग अशी अशीच असते. लोक याच कैफात आहेत. तिथे आर्थिक प्रश्नांना थारा नसतो. किंबहुना तो रकानाच नसतो.

हे नामांतरण सुरु असतांना दुसऱ्या तशाच प्रकृतीच्या हालचाली या राज्यात सुरु आहेत. ग्वाल्हेर उच्च न्यायालय परिसरात बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अनावरण भिजत पडलेले आहे. ४-५ महिने लोटून गेले. ११ फुटाची प्रतिमा कापडात गुंडाळून आहे. ‘नाही उभारु देणार’ आवाज मोठा आहे. नवनवे आक्षेप पूढे केले जातात.

     शिल्प तयार झाले , 'हायकोर्ट' परिसरात चबुतरा तयार झाला हे विनापरवानगीने होईल काय ? शक्य तरी आहे काय ? शिल्प उभारणारे आंबेडकर प्रेमी वकील कमी पडले. विरोधी आवाजाने आता चबुतऱ्यावर तिरंगा रोवला. वाद भलतीकडेच नेलाय. 

विशेष म्हणजे ग्वाल्हेर चे खासदार भाजपचे आहेत. शेजारच्या गुनाचे खासदार केंद्रात मंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री ओबीसी आहेत. अन् .. न्यायालय परिसरात आंबेडकर अडकले आहेत !

     असे राज्याच्या या प्रयोगशाळेत सुरू आसतांनाच .. नुकतेच इथल्या आदिवासी मंत्र्याने देश हलवून टाकला. धाडकन कोसळावे तसे ते बोलले. मानबिंदू ठरलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांना अशोभनीय उपमा दिली. अजबगजब बोलून गेले. आता चुकून झाले म्हणतात.

     हे मंत्री साधेसुधे नाहीत. आठ वेळचे आमदार आहेत. यांना 'कुंवर' म्हटले जाते. गोंड जमातीवर यांचे प्रभुत्व आहे. यांना हात लावणे भाजपला अवघड झालेय. सर्वोच्च न्यायालय , उच्च न्यायालय यांनी टिप्पणी करुनही आदिवासी मंत्री कुंवर विजय शाह मोकळे आहेत.

याच बोलरांगेत आता इथलेच उपमुख्यमंत्री उभे आहेत. ते म्हणतात , ‘देशाची सेना व देशाचे लोक .. प्रधानमंत्रीप्रती नतमस्तक आहेत !’. व्वा ! धन्य उपमुख्यमंत्री जगदीश देवडा !

    ‌हे बोलघेवडेपण उगाच असेल काय ? विवादित टिप्पणी इथपर्यंतच हे मर्यादित नाही. यांच्या मानसिकतेतून ती प्रसूती आहे. प्रसुतीलाच प्रस्तुती म्हणूया. ही सारी कट्टर हिंदुत्वाची भयंकरता आहे.

यांना , राज्याला प्रयोगशाळा म्हणणे अभिमानास्पद वाटते. संविधानाची प्रयोगशाळा अद्याप ऐकले नाही. हिंदुत्वाची प्रयोगशाळा हे ऐकायला येते. उत्तराखंड ही स्वतःला तसे म्हणवून घेतोय.

     प्रयोग यशस्वी झाला की , दुसरीकडे तो लागू होतो. या प्रयोगशाळेतच हिंदूराष्ट्र दडलेले आहे. हिंदुकरण जेव्हा संघीकरणाकडे वळते तेव्हा अशा उक्तीकृती घडतात. 

आव्हाने मोठी असली तरी ती अज्ञानातून आहेत. नक्की सरतील. जागरण तेव्हढे कौशल्यपूर्वक अखंड सुरू ठेवावे लागेल. हा पहिला उपाय ठरू शकेल !

० रणजित मेश्राम

👤

- Advertisment -

Most Popular

Recent Comments