महाड चवदार तळ्याला भेट देऊन भीमसैनिकांची महामानवाला मानवंदना
महाड, दि.२० – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. त्या महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभरातून आंबेडकरी अनुयायांनी चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीची प्रेरणा घेतली.
महाड येथील चवदार तळ्याला राज्यभारतील आंबेडकरी अनुयायांनी आज गुरुवारी भेट दिली. महाड चवदार तळ्याच्या क्रांतीच्या आठवणी जागवून आंबेडकरी अनुयायांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत व्यवस्थेच्या विरोधात रणशिंग फुंकण्याची प्रेरणा घेतली.
महाड चवदार तळे सत्याह दिनानिमित्त सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. या दोन्ही मंत्री
महोदयांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मंत्री संजय शिरसाट व भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शासकीय मानवंदना देण्यात
आली. यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलिस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून चवदार तळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी ना. संजय शिरसाट म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांना अभिवादन करण्याचा मान मिळाला हे आमचे भाग्य समजतो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना स्थानिक आमदार आणि आताचे मंत्री भरत गोगावले यांनी महामानवाला शासकीय मानवंदना मिळावी, ही मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी या मागणीला तत्काळ मान्यता दिली होती. चवदार तळे सुशोभिकरणासाठी लागणारा निधी देण्यात येईल. चवदार तळे येथील पाणी पिण्यायोग्य नाही, तरी सामाजिक न्याय खात्यातर्फे याठिकाणी फिल्टरेशन प्लान उभा करून चवदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य केले जाईल.
आनंदराज आबेडकर आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांनी चवदार तळ्याला भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
सायंकाळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले याच्या अध्यक्क्षतेखाली अभिवादन सभा पार पडली यावेळी राज्यभरातून आलेले कार्यकर्ते उपस्थित होते.
▪️▪️▪️

