भदंत डॉ.खेमधम्मो महाथेरोनागलोक असोसिएशन पुणे या संस्थेच्या वतीने दिनांक 23 मे 2026 रोजी, नवी सांगवी पुणे येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विचार मंचावर पू.भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो, माजी न्यायाधीश ऍड. अनिल वैद्य, मा. पौर्णिमा काटकर,डॉ. प्रवीण गांगुर्डे, प्रा.रवींद्र इंगोले(सचिव), विजय चौधरी हे विराजमान होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.पुरुषोत्तम गाणार हे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सचिव रवींद्र इंगोले यांनी संस्थेचा परिचय करुन दिला. संस्थेचे विविध उपक्रम- महापुरुषांची जयंती व स्मृतिदिन साजरी करणे, वधू-वर परिचय मेळावा घेणे, करिअर गायडन्स सेंटर चालविणे, गरजूंना आर्थिक सहाय्य देणे अशा विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम गाणार यांचे हस्ते करण्यात आले. *सुरुवातीला भंते डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी व्याख्यान देताना* सांगितले की,” धम्म चळवळ निष्ठेने गतिमान केली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महत्त्वाकांक्षी उद्देशानुसार अखिल भारतीय स्तरावर भिक्खू संघ निर्माण केला पाहिजे. या देशात बौद्ध धम्म गतिमान करण्यासाठी इंटरनॅशनल भिक्खू ट्रेनिंग सेंटर विविध जिल्ह्यांमध्ये उभारले पाहिजेत. भिक्खू हा मिशनरी ध्येयाचा पाहिजे. .
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया च्या *सेवानिवृत्त डायरेक्टर मा. पौर्णिमा काटकर* यांनी “राजकीय सत्तेसाठी षडयंत्र, एक चिंतन” या विषयावर बोलतांना सांगितले की, . राजकीय सत्ते शिवाय या देशात शोषित वंचितांचे अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही. या देशांमध्ये विविध स्तरावर असमानता (graded inequality) आहे. या देशात अंधश्रद्धेच्या नावावर लोकांत भेदभाव केला जातो. विषमता निर्माण केली जाते. काही लोकांच्या हातामध्ये सत्ता व अधिकार आहेत.
त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. न्यायसंस्थेमध्ये ,निवडणूक प्रक्रियेमध्ये भेदभावाचे राजकारण केले जाते. बाबासाहेबांनी सांगितले होते की ,”आता राणीच्या पोटातून या देशाचा राजा निर्माण होणार नाही तर तो सर्वसामान्यांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून निर्माण होईल.” *मुख्य अतिथी माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी संविधानिक आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या विषयावर बोलताना सांगितले* की,” महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला शैक्षणिक निवेदन दिले होते.एकाच वर्गाची प्रशासनात मक्तेदारी होत आहे व त्यामुळे इतर समाजाच्या मनात न्यूनगंड निर्माण होत आहे. सर्वांना सारखे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती.छ. शाहू महाराजांनी सुद्धा या समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली होती. याच पार्श्वभूमीवर शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचे रान केले. त्यांनी विषमतेचे, *जातीभेदाचे चटके सोसल्यामुळे या जगण्याच्या अनुभवातून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना आरक्षण दिले. मनामध्ये कोणताही राग न ठेवता संविधान लिहिताना सर्व* *घटकांचा विचार केला.* आरक्षण हे समता प्रस्थापित करण्यासाठी आहे. आज या देशामध्ये नोकऱ्यांमध्ये फार मोठा अनुशेष आहे, राखीव जागा ह्या निर्धारित वेळेत भरल्याच पाहिजेत. तेरा टक्के आरक्षण पूर्ण भरलेले नाही. विविध अनुसूचित जातीमध्ये विद्यार्थ्यांचे शाळा, कॉलेज सोडल्याची टक्केवारी मोठ्या प्रमाणात आहे.

रायटिंग अँड स्पीचेस या ग्रंथातील अनेक पुरावे वाचल्यास जनतेमध्ये जागृती होईल. आरक्षणाची वेगळी ट्रीटमेंट शोषित वंचित माणसाला का द्यावी लागते हे कळेल. बाबासाहेबांनी अनुसूचित जाती ,जमाती, आदिवासी ,ओबीसी ह्या सर्व गटातील लोकांची प्रगती डोळ्यासमोर ठेवली होती. आज अनुसूचित जातीत अ, ब, क,ड वर्गीकरण करणे हे अन्यायकारक आहे. *त्यानंतर अध्यक्षीय मनोगतात आयु.पुरुषोत्तम गाणार यांनी सांगितले की, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यां* पर्यंत पोहोचवणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक विहार ही धम्म प्रशिक्षण केंद्र निर्माण झाले पाहिजेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र इंगोले यांनी केले. आभार प्रदर्शन विजय चौधरी यांनी केले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.यशोधरा नितनवरे यांनी केले.
या कार्यक्रमात विविध गाणी, नृत्य, कविता सादर करण्यात आल्या. मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास गजभिये, खेमेंद्र राऊत, पंकज सुखदेवे, प्रकाश वाघमारे, ऍड. विलास गायकवाड, विजय चौधरी, अंबादास खाडे, बाबुराव अलोने, प्रतीक्षा कांबळे, डॉ.राहुल पाटील, बुवासाहेब अहिवळे, प्रणव रोकडे, पत्रकार विजय गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.


