कांद्री–कन्हान येथे भीम जयंतीनिमित्त तीन दिवसीय सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न
नागपुर
कांद्री–कन्हान (शंकर नगर प्रभाग क्र. १६) येथे बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय भव्य व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेविका तथा महिला व बालकल्याण विकास विभागाच्या सभापती अॅड. रोशनीताई अतुल गजभिये यांनी भूषविले.
१४ एप्रिल २०२६ रोजी प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचा समावेश होता. विशेष आकर्षण ठरलेले पथनाट्य “महापुरुष आणि आजची तरुण पिढी” या विषयावर आधारित होते. या पथनाट्याद्वारे समाजातील मूल्यांची जाणीव आणि तरुण पिढीसमोरील आव्हानांवर प्रभावी भाष्य करण्यात आले.
कार्यक्रमात कांद्री–कन्हान व शंकर नगर परिसरातील नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्साहात उपस्थिती दर्शवली. तसेच अतुल येरगुडे संच यांच्या वतीने प्रबोधनपर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला, ज्यामुळे वातावरण प्रेरणादायी झाले.
प्रमुख वक्त्या म्हणून रूपालीताई पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संविधानाचे महत्त्व, सामाजिक समता आणि शिक्षणाची गरज यावर सखोल विचार मांडले. अॅड. रोशनीताई गजभिये यांनी संविधान जनजागृती अभियान राबवत निबंध, चित्रकला आणि भाषण स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविले. त्यांनी नागरिकांना मूलभूत हक्क व कर्तव्यांची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉली वाघउके आणि अनन्या तिवारी यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. १५ एप्रिल रोजी भव्य भीम जयंती महारॅली काढण्यात आली, ज्यामध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंकर नगर प्रभागातील कार्यकारी मंडळ व स्थानिक कार्यकर्त्यांनी मोठा मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या एकजुटीमुळे कार्यक्रम भव्य आणि संस्मरणीय ठरला.
हा उपक्रम केवळ जयंती साजरी करण्यापुरता मर्यादित न राहता समाजप्रबोधन, संविधान जागृती आणि सामाजिक ऐक्य वाढविणारा ठरला.

