Thursday, June 11, 2026
Homeमंबई"भीमा, तुझा पॅंथर आज उत्सवात दंग झाला… अन्याय-अत्याचार होत आहे, निमूट बघत...

“भीमा, तुझा पॅंथर आज उत्सवात दंग झाला… अन्याय-अत्याचार होत आहे, निमूट बघत उभा राहिला”

लेखक प्रकाश लांडगे मुंबई प्रतिनिधी

“माझे विचार, माझी ताकद”!
स्वामी आनंद स्वरूप नावाने स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीने अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या व्हिडिओमध्ये जाहीरपणे महार समाजाचा अपमानास्पद उल्लेख करत, अस्पृश्यतेची भाषा वापरत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना लक्ष्य करत अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली. एका विशिष्ट समाजाला “वाईट प्रवृत्तीचा” ठरवत इतिहास विकृत स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून दिसून येतो. हा केवळ एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अभिप्राय नसून, समाजाच्या सन्मानावर आणि संविधानिक मूल्यांवर थेट प्रहार आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना, त्यावर अपेक्षित तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत नाही.

समाजाच्या आत्मसन्मानावर आघात होतो तेव्हा इतिहास साक्षी असतो की काही पिढ्या पेटून उठतात आणि काही पिढ्या शांत बसून स्वतःलाच हरवून बसतात. आजची परिस्थिती पाहिली तर हा प्रश्न अस्वस्थ करतो की आपण कोणत्या पिढीत उभे आहोत? कारण एक व्यक्ती उघडपणे समाजाच्या अस्तित्वावर, त्याच्या अस्मितेवर आणि थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर हल्ला करत आहे, आणि त्याच्या विरोधात अपेक्षित तीव्रता, ती ठाम भूमिका समाजातून दिसत नाही. शब्दांनी जखम करणाऱ्यांविरुद्ध कायदा आहे, संविधान आहे, अॅट्रॉसिटी अॅक्ट आहे, पण त्याचा वापर करण्याची इच्छाशक्तीच हरवली आहे का असा प्रश्न निर्माण होतो.

जेव्हा कोणी अस्पृश्यता, जातीय अपमान आणि इतिहासाचे विकृत चित्र उभं करून समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो केवळ एका समाजाचा अपमान करत नाही, तर संविधानिक मूल्यांवरच प्रहार करत असतो. हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाही, हा सामूहिक अस्मितेचा प्रश्न आहे. अशा वेळी अपेक्षा असते की समाजाचे नेते, पुढारी आणि विचारवंत पुढे येऊन स्पष्ट भूमिका घेतील, कायदेशीर कारवाईची मागणी करतील आणि समाजाच्या आत्मसन्मानाचे रक्षण करतील. परंतु वास्तवात दिसतं ते वेगळंच चित्र — शांतता, उदासीनता आणि एक प्रकारची स्वीकारलेली निष्क्रियता.

आज समाज मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्याच्या तयारीत आहे. उत्सव, मिरवणुका, सजावट आणि घोषणाबाजी यामध्ये ऊर्जा खर्च होत आहे. पण याच वेळी जेव्हा अपमान होत आहे, तेव्हा तीच ऊर्जा न्यायासाठी, स्वाभिमानासाठी का वापरली जात नाही? हा विरोधाभास केवळ दुर्दैवी नाही, तर धोकादायक आहे. कारण जे समाज स्वतःच्या अपमानावर शांत राहतात, त्यांचा अपमान करणे इतरांसाठी सहज आणि सुरक्षित बनतं.

मुंबई विद्यापीठात पाली भाषेच्या संवर्धनासाठी एक भंते सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. ही भाषा केवळ एक भाषा नाही, ती बुद्धांच्या विचारांची वाहक आहे, ज्ञानाची परंपरा आहे. त्या आंदोलनाकडेही समाजाचं दुर्लक्ष होतं. म्हणजेच प्रश्न केवळ एका व्यक्तीच्या वक्तव्याचा नाही, तर एकूणच सामाजिक जाणीव सुस्त होण्याचा आहे. संघर्षाची परंपरा असलेल्या समाजात आज संवेदनशीलता आणि लढाऊ वृत्ती कमी होत चालली आहे का, हा विचार करायला भाग पाडणारा मुद्दा आहे.

वामनदादांच्या ओळी आज पुन्हा मनात घुमतात “भीमा, तुझ्या मताचे जरी पाच लोक असते, तलवारीच्या त्यांचे न्यारेच टोक असते.” या ओळी केवळ काव्य नाहीत, तर चेतावणी आहेत. आज त्या पाच लोकांची उणीव भासत आहे. विचारांशी निष्ठा ठेवणारे, अन्यायाला तात्काळ उत्तर देणारे, आणि कायद्याच्या चौकटीत राहूनही तीव्रतेने लढणारे लोक कमी होत चालले आहेत.

आज गरज आहे ती उत्सवप्रियतेपासून जागरूकतेकडे वळण्याची. बाबासाहेबांना केवळ डोक्यावर घेऊन नाचण्यात अर्थ नाही, त्यांच्या विचारांना कृतीत उतरवण्यातच खरी श्रद्धा आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, कायद्याचा योग्य वापर करणे, आणि समाजाच्या सन्मानासाठी एकत्र उभं राहणं हीच खरी आंबेडकरी परंपरा आहे.

जर आजही समाज शांत राहिला, तर उद्या हा अपमान अधिक तीव्र होईल. आणि मग प्रश्न उरेल — चूक त्या व्यक्तीची होती का, की शांत बसणाऱ्या समाजाची?

कारण इतिहास नेहमीच एका गोष्टीची नोंद ठेवतो — अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे अधिक दोषी ठरतात.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments