न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत सामूहिकरित्या मनुस्मृतीचे दहन; राज्य सरकारला धरले धारेवर
दिनांक- २५ सप्टेंबर २०२४
छत्रपतीं शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मते मागणारे आणि शाळकरी मुलांच्या पुस्तकातूनच महाराजांना आणि बाबासाहेबांना हद्दपार करण्याचे कारस्थान भाजप प्रणित राज्यातील शिंदे सरकारने केल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी केला. राज्यात मनुवादी विचारांचे असंवैधानिक सरकार असून यांना हद्दपार करण्याची वेळ आल्याचे कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्वेंशन सेंटर समोरील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे दहन करतांना ते बोलत होते.
काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजप नेत्यांकडून वारंवार जीवेमारण्याची धमकी दिली जात आहे. आरएसएसने जात जनगणनेला उघडपणे विरोध केला आहे. भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही. त्यांना दलित, मागासवर्गीय, आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत असल्याचे यावेळी डॉ. राऊत म्हणालेत.
राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. सर्वाधिक बलात्काराचे गुन्हे मुंबईत दाखल असून दुसऱ्या क्रमांकावर मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाण्याचा क्रमांक लागतो आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फेल झाले असल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला. यावेळी न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे कार्याध्यक्ष राजेश लाडे प्रामुख्याने प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्यातील भाजप प्रणित सरकार मनुवादी जुने बुरसटलेले विचार आणि वर्णभेदाला पुरस्कृत करण्याचा प्रयत्न राज्यात करित असल्याचा आरोप करित त्यांनी मनुस्मृतीची होळी केली. मनूने मनुस्मृतीत चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. चातुर्वर्ण्यांचे पावित्र्य राखावं अशी शिकवण मनूने दिली होती. त्यातूनच जातीव्यवस्थेला प्रोत्साहन मिळाल आहे. मनूने जातीव्यवस्थेतील बीजे पेरली आहेत. तरीदेखील राज्यातील राज्यकर्त्यांना महाराष्ट्रात मनूचे राज्य आणि चातुर्वण्य व्यवस्था पुन्हा रुजवायची असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे.
प्रसंगी गोपाल राजवाडे, राहुल घरडे, रुपराज गौरी, विजया हजारे, कुणाल खोब्रागडे, सचिन वासनिक, दीपा गांवडे, कल्पना द्रोणकर, संदीप सिंग, स्वप्नील, राहुल शेंडे, संतोष खडसे, अभिजित सांगोडे, निशिगंधा वाघमारे, चेतन तरारे यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

