Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रआंबेडकरी जनतेच्या प्रक्षोभानंतर उपमुख्यमंत्री फडणविसांनी कमान पुन्हा बांधून देण्याची ग्वाही दिली.

आंबेडकरी जनतेच्या प्रक्षोभानंतर उपमुख्यमंत्री फडणविसांनी कमान पुन्हा बांधून देण्याची ग्वाही दिली.

सांगली, दि. 22 (मूकनायक, शफीक शेख):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी जनतेने दाखविलेल्या प्रक्षोभानंतर घटनेचे गांभिर्य ओळखत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी पाडलेली कमान पुन्हा बांधून देण्याचे आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा विजय असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
बेडग येथील कमान पाडल्याच्या निषेधार्थ गावातील आंबेडकरी विचारांचे लोक लेकराबाळांसह गेल्या तीन दिवसांपासून मुंबईला चालत निघाले आहेत. त्यावर काल विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आंदोलकांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिडिओ कॉलव्दारे चर्चा घडवली.
डॉ. महेश कांबळे यांनी या विषयाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. बेडगचे सरपंच उमेश पाटील यांनी मुद्दाम हा प्रकार केला असून पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांची त्यांना फूस आहे. त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून कमान पाडायला लावली, अशी तक्रार त्यांनी केली. जे घडले ते चुकीचे आहे, दलित समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही. पाडलेली कमान शासन पुन्हा बांधून देईल. त्याचवेळी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने यात कार्यवाही केली आहे, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला तत्काळ तसे आदेश दिले. यावेळी आमदार विनय कोरे, पृथ्वीराज देशमुख, समित कदम, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिलीप राजूरकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, सचिन कांबळे, उमेश धेंडे आदी उपस्थित होते.
डॉ. महेश कांबळे म्हणाले, “आम्ही गुन्हा दाखल होईपर्यंत लाँग मार्च सुरूच ठेवणार आहोत. शनिवारी सकाळी आठपर्यंत त्यांनी आमच्या हातात गुन्हा नोंदवल्याची कागदपत्रे द्यावीत.”

बेडग प्रश्नावरील बैठकीला पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार सुरेश खाडे आले होते. त्यांच्याविषयीच आंदोलनकर्त्यांची मुख्य तक्रार असल्याने त्यांना या बैठकीला बसू दिले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे फडणवीस यांनी पालकमंत्री खाडे यांना बाहेर थांबण्यास सांगितले. पालकमंत्री खाडे आणि खासदार संजय पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच कमान पाडली गेली आणि त्यांचाच प्रशासनावर दबाव असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments