Thursday, June 11, 2026
Homeमंबईधर्मांतर विरोधी कायदा आणि उपवर्गीकरण हे सामाजिक फूट पाडण्याचे षडयंत्र : भारतीय...

धर्मांतर विरोधी कायदा आणि उपवर्गीकरण हे सामाजिक फूट पाडण्याचे षडयंत्र : भारतीय बौद्ध महासभेच्या प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादनबौद्ध जनगणना, धम्मक्रांती आणि सामाजिक ऐक्यावर भर

मुबंई प्रतिनिधी | प्रकाश लांडगे |

9920806563

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धर्मांतरित मातंग, वाल्मीकी, चर्मकार, ढोर आदी समाजातील बौद्ध बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष “श्रामणेर – बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिर” आणि माता रमाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित “केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिर” उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने धर्मांतर विरोधी कायदा, उपवर्गीकरण आणि बौद्ध जनगणना या विषयांवर विशेष प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम गुरुवार, दि. 21 मे 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दि. 12 मे ते 21 मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या इतिहासातील पहिल्या विशेष “श्रामणेर – बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचा” समारोप तसेच दि. 21 मे ते 27 मे या कालावधीत होणाऱ्या “केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन” प्रसंगी आयोजित या प्रबोधन सत्रात विविध मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर, ॲड. डॉ. एस. के. भंडारे (ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष, केंद्रीय कार्यालय प्रमुख), आयुष्यमान प्रबुद्ध साठे (धर्मांतरित व प्रसिद्ध बौद्ध धम्म प्रचारक), आयुष्यमान डी. एस. नरसिंगे (धर्मांतरित बौद्ध व राज्य संघटक) तसेच आयुष्यमान अच्युत भोईटे (बौद्ध धम्म प्रचारक व अभ्यासक) यांनी धर्मांतर विरोधी कायदा, उपवर्गीकरण आणि जनगणना विषयावर आपले विचार मांडले.वक्त्यांनी सारांशरूपाने मांडणी करताना धर्मांतर विरोधी कायदा आणि उपवर्गीकरण हे सामाजिक षडयंत्र असल्याचे मत व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमुळे मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारला जात असून, त्या प्रक्रियेला अडथळा निर्माण करण्यासाठी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. तसेच महार (बौद्ध) आणि मातंग समाजामध्ये कृत्रिम वाद निर्माण करून सामाजिक एकता कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.जनगणनेबाबत मार्गदर्शन करताना, धर्माच्या कॉलममध्ये “बौद्ध”, जातीच्या कॉलममध्ये “धर्मांतरापूर्वीची जात” आणि भाषेच्या कॉलममध्ये “पाली” नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संविधानवादी शक्तींनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.या कार्यक्रमादरम्यान एक महत्त्वपूर्ण घटना घडली असून, मातंग समाजातील चार जणांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारली. बी. एच. गायकवाड गुरुजी यांच्या हस्ते श्रामणेर संघ आणि उपस्थित जनसमुदायाच्या साक्षीने हा दीक्षाविधी पार पडला.

कार्यक्रमास आदरणीय भंते विशुद्ध बोधी (सदस्य, बौद्ध महासभा भिक्खू संघ), कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय विभाग सचिव), सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख), ॲड. डॉ. एस. एस. वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख), बी. एच. गायकवाड गुरुजी (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय पर्यटन विभाग प्रमुख), सी. बी. तेलतुंबडे (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), बी. एम. कांबळे (राष्ट्रीय सचिव) आणि प्रशांत गडकरी (महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.विशेषतः धर्मांतरित मातंग, वाल्मीकी, चर्मकार, ढोर आदी समाजातील बौद्ध बांधवांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने या प्रशिक्षण शिबिरात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय कार्यालय आणि केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे एम. डी. सरोदे गुरुजी (उपप्रमुख), सुप्रियाताई कासारे (उपप्रमुख), अनिल मनोहर (सचिव), सुनंदाताई पवार (सचिव), सागर गांगुर्डे (सचिव), सुनील बनसोडे (सदस्य व शिबिर व्यवस्थापक) तसेच चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे, मुंबई प्रदेश संरक्षण सचिव मिलिंद कदम आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार म्हणून पांडुरंग साळवे, त्रिभुवन गुरुजी यांच्यासह मुंबई परिसरातील महाराष्ट्र राज्य शाखेचे महिला व पुरुष पदाधिकारी, विविध शाखांचे कार्यकर्ते, बौद्धाचार्य, प्रशिक्षणार्थी आणि धम्मप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी “नमो बुद्धाय, जय सम्राट, जय भीम, जय संविधान” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मुकनायक मुंबई ब्युरो चीफ

प्रकाश लांडगे मो. 9920806563

Previous article
Next article
- Advertisment -

Most Popular

Recent Comments