मूकनायक विशेष… मुंबई, ३ मे २०२६
स्वावलंबनाची एक अनुकरणीय घटना कळंबोली येथील तथागत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली. बुद्ध जयंतीच्या पावन दिवशी भंते किंवा बौद्धाचार्य उपलब्ध नसतानाही आयुष्यमान शशिकांत जगताप यांनी स्वतः त्रिशरण, पंचशील घेत, गाथांचे पठण करत संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. ही घटना केवळ एका सोसायटीचा कार्यक्रम नव्हती, तर बौद्ध धम्मातील स्वावलंबन, जबाबदारी आणि आत्मनिर्भरतेच्या मूलभूत तत्त्वांची जिवंत साक्ष ठरली.
आजच्या काळात बौद्ध कुटुंबांमध्ये धम्मविधी, पूजन, जयंती उत्सव आणि विविध घरगुती कार्यक्रम बौद्ध पद्धतीने साजरे करण्याची सशक्त परंपरा निर्माण होत आहे. या प्रक्रियेत बौद्धाचार्य, भंते आणि धम्मप्रचारकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. परंतु प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी भंते उपलब्ध असतीलच असे नाही. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी कार्यक्रम पुढे ढकलले जातात किंवा रद्द केले जातात. मात्र खरा बौद्ध उपासक तोच, जो परिस्थितीवर अवलंबून न राहता धम्माला केंद्रस्थानी ठेवतो.

कळंबोलीतील तथागत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने याचे ज्वलंत उदाहरण घालून दिले. भंते अनुपस्थित असतानाही शशिकांत जगताप यांनी धम्मकार्य थांबू दिले नाही. त्यांनी स्वतःच कार्यक्रमाची जबाबदारी घेतली, त्रिशरण-पंचशील घेतले, बुद्धवंदना केली आणि गाथा पठण करत उपस्थित सर्वांना धम्माचे महत्त्व पटवून दिले. ही कृती केवळ धाडसाची नव्हती, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मदीक्षेच्या अधिकाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी होती. बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले होते की, “धम्माचा अभ्यास करा आणि इतरांनाही धम्माची शिकवण द्या.” शशिकांत जगताप यांनी या शिकवणीला कृतीत उतरवून दाखवले.

या कार्यक्रमाला समाजसेवक आयुष्यमान राजेश भाई वाघमारे, राजू पंडित, अनुकूल मोरे, त्यांच्या पत्नी मंगल अनुकूल मोरे, संजीव चंदनशिवे, हिरामण वाघमारे, जयराज जयस्वाल, अमजद खान, प्रफुल घोलप, रितेश छेडा, अजय निकम, शंकर लिंगम यांसह अनेक धम्मबांधवांची उपस्थिती लाभली. सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम यशस्वी केला. तथागत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ही केवळ राहण्याची जागा नसून, बौद्ध मूल्यांची प्रयोगशाळा बनली आहे. इथे विचार आणि कृती यांचा सुंदर संगम दिसून येतो.
आपल्या पूर्व आश्रमीच्या धर्मामध्ये धार्मिक विधींच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक शोषणाचे वास्तव सर्वांसमोर आहे. विवाह, अंतिम संस्कार, घरगुती विधींसाठी मोठ्या रकमा आकारल्या जातात. याच्या विपरीत बौद्ध धम्म हा ज्ञान, समता, स्वावलंबन आणि समानतेवर आधारित आहे. यात कोणतीही आर्थिक सक्ती नाही, कोणतीही अंधश्रद्धा नाही. प्रत्येक उपासक स्वतः शिकतो, समजतो आणि समाजात ते ज्ञान पसरवतो.
या घटनेने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की, प्रत्येक बौद्ध उपासकाने त्रिशरण, पंचशील, बुद्धवंदना, गाथा आणि धम्मविधी यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही अडचणीमध्ये धम्मकार्य थांबणार नाही. उलट अधिक आत्मविश्वासाने पुढे जाईल.
तथागत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि आयुष्यमान शशिकांत जगताप यांनी दाखवलेला हा आदर्श संपूर्ण बौद्ध समाजासाठी दिशादर्शक ठरला आहे. हा केवळ एक प्रसंग नाही, तर एक चळवळ आहे. ही चळवळ प्रत्येक बौद्ध घरापर्यंत पोहोचली पाहिजे. जेव्हा प्रत्येक उपासक स्वतः सक्षम होईल, तेव्हाच बौद्ध धम्माचा खरा, सशक्त आणि स्वावलंबी प्रसार होईल.
मूकनायक मुंबई ब्युरो चीफ
प्रकाश लांडगे
मो. ९८२०८०६५६३
जय भीम !

