Saturday, March 14, 2026
Homeमहाराष्ट्रमहिना उलटून ही ग्रामसभेचा ठराव न दिल्याने संताप; लखमापूर ग्रामपंचायत कार्यालयाला सामाजिक...

महिना उलटून ही ग्रामसभेचा ठराव न दिल्याने संताप; लखमापूर ग्रामपंचायत कार्यालयाला सामाजिक कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे.

मूकनायक/अमोल भालेराव.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.

लखमापूर (ता. दिंडोरी) – ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत देण्यास ग्रामपंचायतीकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते रविराज सोनवणे व साहिल सोनवणे यांनी मंगळवारी लखमापूर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले.या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार,दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरातील MIDC क्षेत्रात अनेक उद्योग कंपन्या कार्यरत आहेत.मात्र या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुण व महिलांना अपेक्षित प्रमाणात रोजगार मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.त्यामुळे गावातील युवक-युवती व महिलांना रोजगारामध्ये प्राधान्य द्यावे, तसेच गावातील पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे तातडीने हाती घ्यावीत,या मागण्यांसाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता.मात्र या ठरावाची प्रत देण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप पँथर रविराज सोनवणे यांनी केला.यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते रविराज सोनवणे व साहिल सोनवणे यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच टाळे ठोकत निषेध नोंदवला.या आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रविराज सोनवणे म्हणाले की, “ग्रामसभेतील ठराव हा गावकऱ्यांचा हक्क आहे.तो देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्यामुळे आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे टाळे काढले जाणार नाही.”
दरम्यान,ग्रामपंचायत कार्यालयात काही कर्मचारी उपस्थित असल्याने घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या आंदोलनाची माहिती मिळताच परिसरातील महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जमा झाले होते. काही काळ गावात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनीही स्थानिकांना रोजगार व गावाच्या विकासाच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.
यावेळी साहिल सोनवणे यांनी सांगितले की,या सर्व मागण्यांसंदर्भात दिंडोरी येथील गटविकास अधिकाऱ्यांना लवकरच निवेदन देण्यात येणार आहे.तसेच स्थानिक तरुणांना रोजगार आणि गावाच्या विकासाबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा,अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान,या घटनेमुळे लखमापूर परिसरात ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.या आंदोलनाला
सामाजिक कार्यकर्ते पँथर रविराज सोनवणे,लखमापूर च्या माजी सरपंच वर्षाताई रविराज सोनवणे,आझाद समाज पार्टी चे जिल्हा अध्यक्ष साहिल सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट,विविध सह.सोसा. चेरमन भास्कर मोगल,मनोज सोनवणे तसेच लखमापूर गावातील महिला,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी वणी पोलीस्टेशन चे पी एस आय गणेश कुटे व पोलीस कर्मचारी यांनी यावेळी चोख बंदोबस्त राखला.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments