धगधगत्या शब्दांनी शोषितांच्या व्यथा मांडणारा, साहित्याच्या तलवारीने अन्यायावर घाव घालणारा, आणि विचारांच्या आगीने समाज परिवर्तनाचा ज्वालामुखी जागवणारा साहित्य योद्धा म्हणजे अण्णाभाऊ साठे. उपेक्षितांच्या जीवनाच्या भळभळत्या जखमा त्यांनी नुसत्याच शब्दांत रंगवल्या नाहीत, तर त्या शब्दांमधून क्रांतीचे रणशिंग फुंकले. सामाजिक विषमतेविरोधात विद्रोही आवाज उठवून ‘साहित्य हेच अस्त्र’ मानणाऱ्या अण्णाभाऊंनी शब्दांच्या साहाय्याने दलित, कामगार, शेतकरी यांच्या आत्मसन्मानाचं नवं विश्व उभं केलं. १ ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती या निमिताने … !
संयुक्त महाराष्ट्राच्या व कामगारांच्या चळवळीत राहून श्रमिक ,शेतमजूर व उपेक्षितांचे दुःख ज्यांनी अनुभवलं आणि या कामगार ,दलितांच्या श्रमशक्तीवर विश्वास ठेवून वर्णव्यवस्थेला पोषक ठरणारी भांडवलशाही हीच दलित ,कामगारांच्या विकासातील अडसर आहे, हे ओळखून ” पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे ” हे कामगार शक्तीचं सत्य वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगासमोर मांडणारे विद्रोही साहित्यिक म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांच्या संघर्षाला शब्दबद्ध केले आहे .
महाराष्ट्राच्या सह्याद्री परिसरातील कृष्णा आणि वारणेच्या आशिर्वादाने सुखमय झालेल्या वाळवे तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वाटेगावात सामान्य कुटुंबात अण्णाभाऊ साठे यांचा १ ऑगस्ट १९२० रोजी जन्म झाला. तो काळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा व मानवमुक्ती आंदोलनाचा काळ होता. तत्कालिन महाराष्ट्राच्या दुष्काळजन्य स्थितीची व प्रतिकूल अशा कौटुंबिक जीवनाची जाणीव व मुंबईतील वास्तव्यात राहून असंघटित व शिक्षणाच्या अभावाने झालेल्या अपरिमीत हानीमुळे ज्यांच्या मर्दपणाचा सामाजिक उत्थानाच्या दृष्टीने मुळीच फायदा झाला नाही अशा वंचित समाजाच्या प्रगतीचे मूळ त्यांनी शोधले. त्यांच्यातील स्वाभिमानाचे तत्वज्ञान जगापुढे मांडण्याचा मानस जपण्याची जीवननिष्ठा व सामाजिक परिवर्तनातून प्रगल्भ विचार मांडणारे प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांनी लोकप्रबोधनाचे महान कार्य केले.आपल्या प्रचंड प्रतिभेच्या बळावर समग्र साहित्यातून स्थितीवादी विचारावर प्रहार करत त्यांनी शोषितांच्या जीवनाला प्रबोधनाची चेतना दिली. प्रतिकूल परिस्थितीत मृत्यूची वेदना घेऊन जीवन निष्ठा जोपासणाऱ्या अण्णाभाऊंना नैतिक मूल्यांवर प्रेम करणारी माणसे जवळची वाटली. विचारशुन्य जगणे हे निरर्थक जगणे असते, अशा मुल्यांवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. श्रीमंताकडून होणारे श्रमिकांचे शोषण व विषम व्यवस्थेकडून अस्पृश्यांची होणारी सामाजिक, पिळवणूक या गोष्टींचा तिरस्कार त्यांना होता. याची प्रचिती त्यांच्या ‘फकीरा’ मधून प्रकर्षाने जाणवते. अण्णाभाऊंच्या प्रतिभेची जात अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची जात होती. त्यांचे साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे क्रांती संघर्ष आहे. शिवाय दलित समाजाची एक वैचारिक चळवळ आहे. बुद्ध-मार्क्स ,फुले ,डॉ. आंबेडकर यांचा वैचारिक वारसा घेऊन पारंपारिक जातीव्यवस्था, सामाजिक विषमता व अर्थव्यवस्था यांच्याशी सतत संघर्ष सुरू ठेवून दलित ,श्रमिक, कष्टकरी ,कामगार यांना स्वाभिमानाने जीवन जगण्याची शक्ती व सत्ता संपत्तीपेक्षा श्रेष्ठ ठरणारी जीवननिष्ठा अण्णाभाऊंच्या साहित्याचा मूलस्रोत आहे. माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या संस्कृतीला अण्णांनी कडाडून विरोध केला . अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या उपेक्षितांचे अंतरंग जाणून घेऊन त्यांच्या जीवनातील दुःख ,दैन्य, दारिद्र्य याला वाचा फोडून स्वाभिमानी व सन्मानाने जीवन जगण्याचा मूलमंत्र त्यांनी जगाला दिला. कापड गिरणी मध्ये काम करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या अण्णाभाऊंनी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचार व प्रसार केला. हे राजकीय अंग जोपासणारे, साम्यवादाचा पुरस्कार करणारे अण्णाभाऊ यांनी रशियाच्या प्रवासातील परदेश दौर्यात रशियाच्या नैसर्गिक ,भौगोलिक, आर्थिक परिस्थितीचा अभ्यास केला .हा त्यांच्या जीवनातील एक दुर्मिळ योग आहे .कम्युनिस्ट पार्टीतील वाद व विघटन यांचा मनावर परिणाम झाल्यामुळे अण्णांनी आपल्या निष्ठा बदलण्याचा विचार केला. १९५६ च्या पुर्वीपासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे “जग बदल घालुनी घाव, मज सांगून गेले भीमराव ” हा डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा महान संदेश आपल्या काव्य पुष्पाची गुंफून आंबेडकरी वैचारिकतेकडे निष्ठांतर केले. आपल्या आशयघन लेखनातून सामाजिक जीवन जाणीवा मांडणारे अण्णाभाऊ साठे हे सामाजिक परिवर्तनाची वैचारिक दिशा देणारे दिशादर्शक व एक कृतिशील साहित्यिक होते. ते शाहीर कथाकार, कादंबरीकार, लोकनाट्यकार ,नाटककार ,गायक ,कलावंत , विचारवंत म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे कार्य जणू एखाद्या निखा-यासारखे धगधगते असले तरी त्यात क्रांतीचे सूर्यतेच होते. तळागाळातील सामान्य माणसांच्या सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा ,सामाजिक सुरक्षिततेची भूमिका घेत निर्माण झालेल्या मानवविनाशी मूल्यांशी त्यांनी झुंज दिली .म्हणून ते सामाजिक जीवनाचा अविष्कार घडविणारे साहित्यिक ठरले. या दृष्टया वैचारिकतेतून त्यांनी नीतिवान आणि सभ्य समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दलित समाजात विद्रोही क्रांतीची बीजं साहित्यबद्ध केले. म्हणून त्यांची वैचारिकता दलित माणसाला अपेक्षित बदलांसाठी उठाव करण्यास प्रवृत्त करणारी आहे .म्हणून विष्णुपंतासारखी व्यक्ती व फकीरा सारख्या शूर मर्दाचा विद्रोही बाणा त्यांनी महाराष्ट्रात समोर ठेवला. दलित साहित्य बरोबरच मराठी सारस्वताचे दालन त्यांनी अधिक समृद्ध केलं. पिढ्यानपिढ्या भयानक दुःख ,दारिद्र्य, अन्याय अत्याचाराच्या वेदना ,उपासमार, गरीबीचे भकास जीवन, भांडवलदार वर्गाकडून होणारे शोषण या अस्वस्थ विचार चक्राचे कुरूप अण्णाभाऊंच्या डोक्यात सलत होते. यातून वर्गीय भूमिका स्वीकारणारी शाहिरी त्यांच्याठायी जन्माला आली .दलित ,श्रमिकांचे सामूहिक दुःख आपल्या तळपत्या शाहिरीद्वारे जनतेसमोर त्यांनी मांडले .म्हणून ते क्रांती कार्याचे सृजक व लोकशाहीर ठरले. त्यांची शाहिरी शौर्य, चैतन्य आणि सामर्थ्य इत्यादी गुणांनी संपन्न आहे .त्याला मर्द मावळ्यांच्या तलवारीची धार आहे ,शेतकरी हा जगाचा पालनकर्ता आहे पण जगाने त्याला विसरले, हे जेव्हा त्यांना वाटले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना जग बदलण्याचे आव्हान केले. हजारो वर्षाच्या श्रृंखला तोडणाऱ्या हातांची ते पूजा करतात. वीरांचे यशोगीत गाणे हा त्यांच्या शाहिरीचा धर्म तर अन्यायाची सांगड सोलून काढणे हे तिचे कर्म होते.लोक निष्ठा आणि देशनिष्ठा या त्यांच्या शाहिरीच्या लेण्या आहेत. हा आदर्श त्यांनी जपला . माझी मुंबई ,माझी मैना गावावर राहिली, उठला मराठी देश, तू मराठमोळा इत्यादी लावण्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. म्हणून वैजंताच्या पायातील नुपूराचा छनछननाट आणि फकिराच्या तलवारींचा खणखणाट हे दोन्ही नाद महाराष्ट्राला अण्णाभाऊ साठे यांच्यामुळे परिचित झाले .जसे ते लोकशाहीर होते तसे ते लोकनाट्याचे प्रवर्तक होते .एक स्वतंत्र अधिष्ठान त्यांनी लोकनाटयाला दिले. त्यांचे लोकनाट्य हे मानवी मनाचा हुंकार आहे . वर्गीय भूमिकेतून जमीनदार,भांडवलदार , हे कामगार व शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करतात याचे प्रत्यक्ष चित्रण त्यांनी लोकनाटयामध्ये उभे केले. त्यांचे लोकनाट्य चैतन्यपूर्ण मानवी जीवनाचा परिपोष आहे. अण्णा भाऊंचा जन्म मुळातच जुलूम आणि अन्याय अत्याचार सोसलेल्या दुःखीतांच्या पोटी झाला असल्यामुळे या समाज जीवन जाणिवाचा स्मृतीकोष करुन त्यांनी दलित कथा लेखन केले. माणसातील स्वाभिमान, शौर्य, प्रतिष्ठा , त्याग, बलिदान आणि माणुसकी यासारखे मानवी प्रतिष्ठेचे सद्गुणही त्यांनी आपल्या कथेत मांडले.. मॅक्झिम गोर्कीची प्रेरणा घेऊन लेखनबध्द झालेल्या अण्णाभाऊंच्या जगण्यासाठी धडपडणाऱ्या कथा आहेत. त्यासाठी लढणे हा त्यांचा स्थायीभाव आहे .कुठे दुःखाश्रू तर कुठे भोगविलास आहे ..कुठे नीतिमत्तेचा बहर.. ! तर कुठे अत्याचाराचा कहर आहे..! सावळा ,बरबाद्या कंजारी, स्मशानातील सोनं सापळा, कोंबडीचोर यासारख्या कथांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. सामाजिक-राजकीय विश्लेषणात्मक आत्मकथा लिहून अण्णाभाऊंनी स्वातंत्र्यपूर्व काळातील दलित जीवनाचे दुःख मांडले .या दुःखाला त्यांनी आत्मिक वाचा दिली. अण्णाभाऊंचे समाजातील उपेक्षित जीवनाबद्दलची निरीक्षण अतिसूक्ष्म व ते स्वातंत्र्य समता बंधुता या तत्त्वाकडे नेणारे आहे. ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटना दुःख, वेदना ,विद्रोह आणि संघर्ष इत्यादीतून समग्र मानवी जीवनाचा विचार त्यांनी मांडला. बंदुकीतील गोळ्यांच्या खुणा मोजणारी कला व उपेक्षितांचे हृदय पिळवटून काढणारे जीवन पाहून अश्रु गाळु लावणाऱ्या कलाकृतीचे ते प्रतिनिधी होते. आपल्या विद्रोही कवनांनी आणि विचाराने संपूर्ण महाराष्ट्र जागवून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती त्यांनी केली. म्हणून त्यांना महाराष्ट्राचे मॅक्झीम गोर्की म्हणतात. भारतीय सामाजिक व्यवस्थेत सामाजिक ,आर्थिक , राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या हजारो वर्षापासून ज्यांची कोंडी केली गेली अशांचे जीवन उन्नत करणे किंवा त्यांच्या जीवनाला उन्नत करण्यासाठी मार्ग दाखविणे, हे अण्णा भाऊंच्या लेखनाचे प्रयोजन होते.शुरांची व स्वाभिमानाची परंपरा पण वळुसारखी चिकटलेली जातीयता आणि इंग्रजी कायद्यांने ज्यांची झुंजार वृत्ती नष्ट केली , त्यामुळे लाचारीचे जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाने लाचारीचे जीवन पुढे जगू नये, स्वाभिमानाने जीवन जगावे यासाठी अस्मिता जागृत व्हावी म्हणून विद्रोह निती केलेली ‘फकिरा ‘ही कादंबरी त्यांनी केली. कृतिशील चळवळीमध्ये उपलब्धी म्हणून वास्तविक भर टाकणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी आग,आघात,अलगुज, आवडी, अहंकार ,अग्निदिव्य, कुरूप, कवड्याचं कणीस ,गुलाम, चिखलातील कमळ ,चंदन, चित्रनगरीची भुतं, चित्रा ,जिवंत काडतुसं ठासलेल्या बंदुका, डोळे मोडीत राधा चाले ,तारा, धुंद फकीरा, फुलपाखरू, माकडीचा माळ , मंगला, मास्तर, मधुरा, मूर्ती, रान गंगा, रानबोका, रत्ना, रूपा, वारणेचा वाघ,सरनोबत, संघर्ष इ. कादंबरीचे लेखन केले. इनामदार ,पेंग्याचं लगीन,हे नाटक लिहिले .शिवाय अकलेची गोष्ट, खापर्या चोर, दुष्काळात तेरावा , देशभक्त घोटाळे, पुढारी मिळाला, बेकायदेशीर, बिलंदर बुडवे ,मिरवणूक, माझी मुंबई, लोकमंत्री, लोकनाट्य, साताऱ्याची तऱ्हा, फकीरा, बारा गावचे पाणी ,इ.चित्रपटकथा आणि माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन असे विपुल लेखन संपादन करणारे अण्णाभाऊ साठे एक साहित्यभूषण ठरतात. त्यांचे साहित्य हे विद्रोही विचारांचा अंगार लेवून आलेल्या शब्दांची अर्थपूर्ण गुंफण आहे. म्हणूनच सभ्य समाज निर्मितीकरिता निती शिकवणाऱ्यांची समाजाकडून उपेक्षा होऊ नये याचा आग्रह धरणार्या या उपेक्षितांच्या भाष्यकारानं वास्तवादी लेखनाच्या बळावर वंचितांच्या जीवन इतिहासाची पानं लिहली. संयुक्त महाराष्ट्रासाठी डफाच्या धनगंभीर तालावर या मराठी शाहीरांनी देशाला इमान शिकविले. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी मुलखात जशा मर्दाच्या तलवारी झिजल्या तशी शाहिरी कामी आली. घनगंभीर पोवाडयाने त्यांना भरे बर्लिनपर्यंत पोहचविले. ‘चित्रा ‘ हि पहिली कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली. म्हणूनच अण्णाभाऊ हे मॅक्झिम गॉर्की प्रमाणे क्रांतिकारक साहित्याचे सृजक ठरतात. आत्मसन्मानी जीवनासाठी धडपडणाऱ्या माणसांच्या जीवनाचे उदगान करणारा उदगाता व लोकजीवनाचा भाष्यकार ठरणाऱ्या या साहित्य सम्राटाचे साहित्य आजही एखाद्या दीपस्तंभासारखे आहे.
( लेखक जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य व प्रेरणादायी वक्ते आहेत तसेच महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार विजेते आहेत . . )
डॉ .भैरवनाथ कानडे ✍🏻(शिक्षक, पत्रकार, लेखक ) चिकुंद्रा ता. तुळजापूर

