मूकनायक विशेष | मुंबई प्रतिनिधी : प्रकाश लांडगे
मुंबई, दि. २७ मे २०२६ : माटुंगा लेबर कॅम्प हा परिसर एकेकाळी आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जात होता. या परिसरातून अनेक वैचारिक लढे उभे राहिले, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना दिशा मिळाली आणि फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे घडत राहिला. मात्र, गेल्या काही दशकांमध्ये या भागातील चळवळीची पूर्वीची वैचारिक उंची आणि सामाजिक एकजूट काही प्रमाणात कमी होत असल्याची जाणीव आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना होऊ लागली.

समाजामध्ये पुन्हा वैचारिक ऊर्जा निर्माण व्हावी, महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचावेत आणि नव्या पिढीने सामाजिक परिवर्तनाचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा या ध्येयातून काही समर्पित कार्यकर्ते एकत्र आले आणि “समता संघर्ष विचार मंच” या वैचारिक व्यासपीठाची स्थापना करण्यात आली.बहुजन समाजाच्या हितासाठी आणि सन्मानासाठी ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, अशा महापुरुषांच्या विचारांचा जागर समाजात सातत्याने होत राहावा, हा या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे.

महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन आणि ऐतिहासिक दिनविशेष साजरे करून समाजामध्ये वैचारिक प्रबोधन घडवणे, समाजातील मूलभूत प्रश्नांवर चर्चा व उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहणे, तसेच बहुजन समाजाला सामाजिक व वैचारिक पातळीवर एकत्रित करण्याचे कार्य करणे, हे संघटनेचे मुख्य ध्येय असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.याच वैचारिक भूमिकेतून आज, दि. २७ मे २०२६ रोजी माटुंगा लेबर कॅम्प येथील इराणी हॉटेलजवळ नऊ कोटी लेकरांची माय माता रमाई यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या श्रमातून आणि आर्थिक योगदानातून पूर्ण केल्याने सामाजिक बांधिलकी आणि समर्पणाचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले.

या कार्यक्रमास विभागातील कर्तव्यदक्ष आणि कार्यसम्राट नगरसेविका हर्षलाताई आशिष मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच माता रमाई यांच्या संघर्षमय, त्यागमय आणि प्रेरणादायी जीवनकार्याचा उल्लेख करत समाजामध्ये त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीच्या प्रवासात रमाई यांनी दिलेले मोलाचे योगदान, संकटांमध्ये दाखवलेले धैर्य आणि त्यागाचे जीवन हे प्रत्येक बहुजन समाजासाठी प्रेरणास्थान असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष गणेश सवणे, कार्याध्यक्ष मिलिंद काळे, कोषाध्यक्ष अतुल बागुल यांच्यासह संघटनेचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी डॉ. सुरेश सावंत, अनिल भंडारे, दिलीप कांबळे, नरसिंग गुर्रम अण्णा, धर्मेश निकम, विशाल निरभवणे, एडवोकेट अनार्य पवार,प्रकाश लांडगे, योगेश सावंत, दिलीप सोहनी, बिपिन सोहनी, सुहास काटे, राजू पाटील, विश्वास गवळे, राजीव जाधव,संतोष पवार, आर. वाय. कांबळे, शशिकांत लोखंडे, बाळासाहेब कांबळे, विलास वाघमारे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय देठे यांनी प्रभावी शैलीत केले.

कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली, तर समारोप सरणतय घेऊन करण्यात आला. यावेळी बौद्धाचार्य प्रकाश लांडगे आणि बौद्धाचार्य योगेश सावंत यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले.दरम्यान, शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी माटुंगा लेबर कॅम्प परिसरातील दहावी व बारावीमध्ये यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार असून, अशाच प्रकारचे सामाजिक, वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आगामी काळात सातत्याने आयोजित करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

समाजाला वैचारिकदृष्ट्या सक्षम करणे, महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक ऐक्य मजबूत करणे ही काळाची गरज आहे. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आयोजित करण्यात आलेली ही अभिवादन सभा केवळ स्मृतिदिनापुरती मर्यादित न राहता सामाजिक जागृतीचा संदेश देणारी ठरली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


