Thursday, June 11, 2026
Homeमंबई“पन्नासाव्या वाढदिवसाला माणुसकीचा स्पर्श: राजू पगारे यांचा प्रेरणादायी उपक्रम”

“पन्नासाव्या वाढदिवसाला माणुसकीचा स्पर्श: राजू पगारे यांचा प्रेरणादायी उपक्रम”

“माझे विचार माझी ताकद…”

जीवनाचा प्रवास हा केवळ वर्षे मोजण्याचा नसतो, तर त्या प्रत्येक वर्षात माणसाने काय कमावले, किती संघर्ष केला आणि समाजासाठी किती दिले, याचा खरा हिशोब असतो. वयाची पन्नास वर्षे पूर्ण होणे म्हणजे फक्त अर्धशतक गाठणे नव्हे, तर अनुभव, संघर्ष, आत्मविश्वास आणि माणुसकीच्या भांडाराने समृद्ध होणे होय. या टप्प्यावर उभा राहून माणूस मागे वळून पाहतो आणि पुढील वाटचालीसाठी नव्या दिशेचा विचार करतो.

माटुंगा लेबर कॅम्प येथील रहिवासी राजू भीमराव पगारे यांचा पन्नासावा वाढदिवस हा अशाच एका विचारसंपन्न आणि प्रेरणादायी दृष्टिकोनाचा जिवंत नमुना ठरला. अत्यंत खडतर परिस्थितीतून, संघर्षाच्या वादळातून मार्ग काढत त्यांनी आपले आयुष्य घडवले. ‘साईराज कॅटर्स’ या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी केवळ आर्थिक स्थैर्य मिळवले नाही, तर समाजाशी असलेली नाळही कायम जपली.

साधारणपणे वाढदिवस म्हटला की, मोठ्या हॉटेलमध्ये मेजवानी, मित्रमंडळींची गर्दी, पार्टी आणि जल्लोष असा एक दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन, त्या दिवसाला खऱ्या अर्थाने अर्थ देण्याचा विचार फार थोडे लोक करतात. कारण असे उत्सव दुसऱ्या दिवशी विसरले जातात, आठवणीतही फार काळ राहत नाहीत.

मात्र राजू पगारे यांनी हा प्रचलित विचार मोडीत काढत आपल्या वाढदिवसाला एक वेगळीच उंची दिली. रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी दादर येथील “श्रीमती कमला मेहता अंध मुलींची शाळा” येथे जाऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ वेगळेपणासाठी नव्हता, तर त्यामागे एक संवेदनशील मन आणि समाजाप्रती असलेली खरी बांधिलकी होती.

त्या दिवशी त्यांनी केवळ केक कापला नाही, तर त्या अंध मुलींसोबत वेळ घालवला, त्यांच्या सोबत जेवण केले, त्यांच्या हसण्यात आपला आनंद शोधला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी त्या मुलींसाठी एक महिन्याकरिता पुरतील अशा गरजेच्या वस्तू देऊन त्यांच्या आयुष्यात थोडासा दिलासा निर्माण केला.

त्या अंध मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा शब्दांत मांडणे कठीण आहे. जणू काही त्यांना त्या दिवशी एक मोठा भाऊ भेटला होता, जो स्वतःचा आनंद त्यांच्यासोबत वाटण्यासाठी आला होता. त्यांच्या चेहऱ्यावरची हसू, डोळ्यांतली चमक आणि मनातील समाधान हेच सांगत होते की, हा वाढदिवस केवळ एक सोहळा नव्हता, तर एक भावनिक बंध तयार करणारा क्षण होता.

जीवनात खरे सुख हे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात असते, हे या प्रसंगातून अधोरेखित होते. कुणालाही त्रास न देता, शक्य तितक्या लोकांना मदतीचा हात देत जगले, तर आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होते. पन्नास वर्षांचा हा टप्पा म्हणजे पुढील आयुष्याला अधिक अर्थपूर्ण, समाजोपयोगी आणि समाधानकारक बनवण्याची एक नवी संधी असते.

राजू पगारे यांचा हा उपक्रम केवळ एक वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार नाही, तर समाजाला दिलेला एक संदेश आहे की, आनंद साजरा करायचा असेल, तर तो स्वतःपुरता मर्यादित ठेवू नये, तो इतरांच्या आयुष्यातही उजेड पसरवेल असा असावा.

अशा माणसांच्या कृतीतूनच समाजात माणुसकी जिवंत राहते आणि अशाच प्रेरणादायी कथा भविष्यातील पिढ्यांना योग्य दिशा दाखवतात.

लेखक.. प्रकाश लांडगे
9920806563
मुंबई महाराष्ट्र

- Advertisment -

Most Popular

Recent Comments