मूकनायक न्यूज
पुणे : अनुसूचित जातींमध्ये सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि संघटनात्मक एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती ऐक्य व बंधुभाव परिषद तसेच मातंग समाज बौद्ध धम्मदीक्षा समारंभाच्या नियोजनाची पहिली बैठक पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या बैठकीत आगामी परिषद आणि बौद्ध धम्मदीक्षा समारंभाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन, समाजातील विविध घटकांचा सहभाग आणि व्यापक जनजागृती यासंदर्भात उपस्थित मान्यवरांनी आपली मते मांडली.
यावेळी दलित पँथरचे अध्यक्ष अंबादास शिंदे, दिलीप लोखंडे, ज्ञानेश्वर खुडे, बापूसाहेब गजधाने, देवेंद्र गायकवाड, अमोल धनवडे, ‘चला आपल्या बुद्धाच्या घरी’ अभियानाचे प्रमुख प्रबुद्ध साठे, अरुण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक समता, बंधुभाव आणि महापुरुषांच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्व उपस्थित मान्यवरांनी एकजुटीने आणि सामूहिक प्रयत्नांतून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अनुसूचित जातींमधील परस्पर ऐक्य अधिक मजबूत करण्याबरोबरच मातंग समाजाच्या बौद्ध धम्मदीक्षा सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले.
स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पुणे स्टेशन, पुणे.
महाराष्ट्र प्रदेश संपादक : अंबादास सैदु शिंदे मूकनायक न्यूज, पुणे
बातमी संकलन : पत्रकार संतोष कांबळे भारतीय दलित पँथर न्यूज

