Saturday, November 28, 2026
HomeUncategorizedनववीतील अपेक्षा कांडरची ऐतिहासिक भरारी! शिवाजी विद्यापीठात पुस्तकाचे प्रकाशन; सहा मिनिटांच्या भाषणाने...

नववीतील अपेक्षा कांडरची ऐतिहासिक भरारी! शिवाजी विद्यापीठात पुस्तकाचे प्रकाशन; सहा मिनिटांच्या भाषणाने मान्यवरांची जिंकली मने

कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते ‘The Boy Who Asked Why’ पुस्तकाचे प्रकाशन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा अभ्यास करून विद्यार्थिनीची साहित्यविश्वात दमदार पाऊलवाट

मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे

कोल्हापूर : वयाच्या अवघ्या नवव्या-दहाव्या वर्षांत नव्हे, तर इयत्ता नववीत शिक्षण घेत असतानाच पुस्तक लेखन करून ते थेट विद्यापीठाच्या व्यासपीठावर प्रकाशित करण्याची उल्लेखनीय कामगिरी कुमारी अपेक्षा कांडर हिने केली आहे. तिच्या ‘The Boy Who Asked Why’ या पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे, या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अपेक्षाने केलेल्या अवघ्या सहा मिनिटांच्या प्रभावी भाषणाने उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या विचारांची मांडणी, आत्मविश्वास आणि वक्तृत्वाचे उपस्थितांनी कौतुक केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ‘भारतीय संविधान आणि स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन राजर्षी शाहू सिनेट सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रा. डॉ. संबोधी देशपांडे यांचे व्याख्यान झाले. याच कार्यक्रमात अपेक्षा कांडर हिच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कुलगुरू डॉ. रजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. संबोधी देशपांडे, प्रा. डॉ. विकास विधाते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. पवन गायकवाड उपस्थित होते.

सहा मिनिटांच्या भाषणाने वेधले मान्यवरांचे लक्ष

पुस्तक प्रकाशनानंतर अपेक्षा कांडर हिने केलेले भाषण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. वयाच्या मानाने परिपक्व विचार, विषयाची समज, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण यांचा सुंदर संगम तिच्या भाषणात पाहायला मिळाला. अवघ्या सहा मिनिटांत तिने आपले विचार मांडत उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली. एका विद्यार्थिनीने इतक्या लहान वयात लेखनासोबतच वक्तृत्वाचीही छाप पाडल्याने तिचे विशेष कौतुक करण्यात आले.

प्रश्न विचारण्याच्या वृत्तीतून पुस्तकाचा जन्म

अपेक्षा हिच्या पुस्तकाच्या मागील मुखपृष्ठावर मार्गदर्शक मदन लाल पवार यांनी लिहिलेल्या संदेशानुसार, त्यांनी सर्वप्रथम अपेक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित केले. या सुरुवातीच्या प्रोत्साहनातूनच पुढे तिला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. एका तरुण विद्यार्थिनीने भारतातील महान विचारवंताच्या जीवनकार्याकडे केवळ माहिती म्हणून न पाहता जिज्ञासा, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि समजून घेण्याच्या प्रामाणिक इच्छेने पाहिले, ही बाब या पुस्तकाच्या प्रवासाला विशेष अर्थ प्राप्त करून देते.

या साहित्यिक प्रवासात मदन लाल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. ते लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अपेक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा अभ्यास करून लेखनाचा प्रयत्न केला आहे.

निर्मिती प्रकाशनाच्या माध्यमातून पुस्तक प्रकाशित

‘The Boy Who Asked Why’ या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूर येथील निर्मिती प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पुस्तकाचा ISBN क्रमांक 978-93-92922-44-2 असा आहे. शिवाजी विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक व्यासपीठावर पुस्तकाचे प्रकाशन होणे, ही अपेक्षाच्या साहित्यिक वाटचालीतील महत्त्वाची उपलब्धी ठरली आहे.

संविधानातील समता आणि सामाजिक न्यायाचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांची जाणीव निर्माण करणे आणि प्रत्येकाने प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासणे, या दृष्टीने अपेक्षाचा लेखनप्रयत्न महत्त्वपूर्ण ठरतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पवन गायकवाड यांनी केले. त्यांनी भारतीय संविधान आणि स्त्री-पुरुष समानता या विषयाचे सामाजिक महत्त्व विशद केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील विविध अधिविभागांचे प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी अपेक्षा कांडर हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लहान वयात मोठे स्वप्न पाहण्याची आणि त्या स्वप्नासाठी ज्ञान, जिज्ञासा व लेखणीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची प्रेरणा अपेक्षा कांडर हिच्या या यशातून मिळते. तिच्या या साहित्यिक भरारीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments