Thursday, June 11, 2026
Homeमुंबईचैत्यभूमी येथे धर्मांतरित ओबीसी, मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी समाजातील बौद्ध बांधवांसाठी विशेष...

चैत्यभूमी येथे धर्मांतरित ओबीसी, मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी समाजातील बौद्ध बांधवांसाठी विशेष श्रामणेर-बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न


प्रकाश लांडगे
मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी
मो.: ९९२०८०६५६३

मुंबई, दि. १२ मे २०२६:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांनी प्रेरित होऊन हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या ओबीसी, मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी समाजातील धर्मांतरित बौद्धांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष श्रामणेर-बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवार, दि. १२ मे २०२६ रोजी दादर येथील चैत्यभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात संपन्न झाले. दहा दिवसांचे हे विशेष शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांनी धर्मांतरित बौद्धांचे स्वागत करत, अशा प्रकारचे विशेष धम्म प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याबद्दल दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अभिनंदन केले. सध्याच्या परिस्थितीत संविधान रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

कार्यक्रमात संस्थेचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी उपवर्गीकरण व बौद्ध जनगणनेच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना सांगितले की, हिंदू धर्मात अस्पृश्य मानल्या गेलेल्या मातंग, चर्मकार, ढोर, वाल्मिकी आदी समाजातून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले हे ऐतिहासिक शिबिर सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अमरसिंह ढाका (महाराष्ट्र राज्य सचिव), डी. एस. नरसिंगे (राज्य संघटक), लक्ष्मीकांत शिंदे, प्रबुद्ध साठे, श्रावण गायकवाड, महेश निनाळे यांच्यासह सर्व शिबिरार्थींचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी बोलताना ॲड. डॉ. भंडारे यांनी समाजात जाणूनबुजून निर्माण केल्या जाणाऱ्या विभाजनकारी प्रवृत्तींवर टीका करत सांगितले की, “महार-बौद्ध आणि मातंग समाजामध्ये कृत्रिम वाद निर्माण करून बौद्ध एकतेला तडा देण्याचा प्रयत्न काही धर्मांतरविरोधी आणि संविधानविरोधी शक्तींमार्फत केला जात आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या सामाजिक क्रांतीला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहणे काळाची गरज आहे.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, धर्मांतरित बौद्धांनी जातीय ओळखीत अडकून न राहता बौद्ध म्हणून एकत्रितपणे समाजपरिवर्तनाच्या कार्यात सहभागी व्हावे.

यावेळी राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी, महाराष्ट्र राज्य महिला शाखा अध्यक्षा स्वातीताई शिंदे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी समयोचित शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर पूज्य भंते विशुद्ध बोधी यांनी श्रामणेर प्रवज्या देत शिबिराची औपचारिक सुरुवात केली. ते या शिबिराचे संघनायक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

या विशेष शिबिरामध्ये बीड, जालना, नांदेड, परभणी, रायगड, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आदी जिल्ह्यांतील धर्मांतरित बौद्ध सहभागी झाले असून, युवकांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आहे.

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख व राष्ट्रीय सचिव ॲड. डॉ. एस. एस. वानखडे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे सचिव अनिल मनोहर यांनी केले. या शिबिरात पूर्णवेळ शिक्षक व सह-संघनायक म्हणून केंद्रीय शिक्षक व महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष (संस्कार) विजय कांबळे हे दहा दिवस चिवर धारण करून शिबिराचे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभाग प्रमुख सुषमाताई पवार, केंद्रीय प्रशिक्षण उपप्रमुख एम. डी. सरोदे गुरुजी, सचिव सुनंदाताई पवार, सागर गांगुर्डे, राष्ट्रीय सचिव डॉ. राजेश पवार, महाराष्ट्र राज्य शाखेचे सरचिटणीस अशोक केदारे, कोषाध्यक्ष प्रशांत गडकरी, महिला शाखा उपाध्यक्षा स्वातीताई गायकवाड, मुंबई प्रदेश अध्यक्ष विलास वानखडे, सरचिटणीस दयानंद बडेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र सत्वधीर, उपाध्यक्ष तानाजी साबळे, संस्कार सचिव संतोष मठकर, संघटक बबन तायडे, महिला शाखा उपाध्यक्ष सुषमाताई कसबे, सरचिटणीस छायाताई बनसोडे, ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड, ठाणे महानगर महिला जिल्हाध्यक्षा मुजमुलेताई, नवी मुंबई अध्यक्ष विजय झणके, सरचिटणीस संजय झणके यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राजगृह येथे जाऊन आदरणीय मनिषाताई आनंदराज आंबेडकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.


प्रकाश लांडगे
मूकनायक विशेष मुंबई प्रतिनिधी
मो.: ९९२०८०६५६३

- Advertisment -

Most Popular

Recent Comments